#गावमाझंवेगळंः उमळवाड रुचकर पेरूचे गाव

#गावमाझंवेगळंः उमळवाड रुचकर पेरूचे गाव

शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत.

कृष्णा काठी वसलेल्या गावात दीडशे वर्षांपूर्वी जिरायत शेती होती. मळीतील पिके पुराच्या पाण्याने बुडून नुकसान होत होते. त्यावेळी तंबाखू, सोयाबीन पिके घेतली जात होती; मात्र बुडाव शेतात नुकसान ठरलेलं. नुकसान होऊ नये या गरजेतून निर्माण झाली पेरूची बाग. अक्षरशः नदीतून घागरीने पाणी घालून रोपे लावली. ती पावसाच्या पाण्यावर जगली. देशी पेरूची झाडे मोठी असत. पुराचे पाणी आले तरी नुकसान होत नव्हते. त्यामुळे संपूर्ण कृष्णा काठ पेरूच्या बागा तयार झाल्या. 

शंभर वर्षांपूर्वी अंदाजे १६० एकरांत पेरूच्या बागा होत्या. मळीच्या लाल मातीतील देशी पेरू, संपूर्ण पावसाच्या पाण्यावर पिकलेली बाग. वैशिष्ट्यपूर्ण मातीमुळे येथील पेरूला गोड, रुचकर चव. त्यावेळी ज्याचे मळीचे शेत, त्याची पेरूची बाग हेच सूत्र होते. जवळपास प्रत्येकाची बाग होतीच.

पहाटे उठून बागेत जायचे. रेल्वे स्टेशन जवळ असल्याने वाहतुकीचे साधन रेल्वेच. सकाळी डोक्‍यावरून डालगे घेऊन नऊच्या रेल्वेने कोल्हापूर गाठायचे. वर्षानुवर्षे हे सुरू असल्याने कोल्हापूर हे उमळवाडच्या पेरूला हक्काची बाजारपेठ ठरले. राजारामपुरी, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, आईचा पुतळा, शिवाजी पुतळा, गंगावेश, भवानी मंडप येथे स्वत: शेतकरी पेरू विकत. प्रत्येक पेरूवाल्याची जागा अन्‌ ग्राहकही ठरलेले. त्यामुळे उमळवाडचे पेरू म्हणजे डोळे झाकून खरेदी करावी आणि पैसेही जादा देण्यास ग्राहक तयार असे. कोल्हापूरसोबत जयसिंगपूर, इचलकरंजी, बांबवडे, मलकापूर, कोडोली, गारगोटी, रत्नागिरी नंतर सांगली अशी बाजारपेठ विस्तारत गेली.

दररोज ५० ते ६० शेतकरी डोक्‍यावर पेरूचे डालगे घेऊन विक्रीसाठी जात. पक्का रस्ता नसल्याने गुडघ्याएवढ्या चिखलातून वाहतूक केली जात असे. १९८८ च्या दरम्यान प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला. त्याच दरम्यान कोथळी, उमळवाड परिसरांत टोमॅटो पिकाची सुरवात झाली.

पूर क्षेत्रात पुराचे पाणी येण्यापूर्वी टोमॅटोचे पीक घ्यायचे व वर्षभर इतर पिके घेण्याचा कल शेतकऱ्यांचा झाला. त्यामुळे पेरूचे क्षेत्र घटले. टोमॅटो हुकमी झाले. कालांतराने उसाला चांगला दर मिळाला. त्यामुळे उस क्षेत्रात वाढ झाली. यामुळेही पेरूचे क्षेत्र अगदी बोटावर मोजण्याएवढे झाले. सन २००५ व २००६ मधील पुराने मोठा फटका बसला. तसेच टोमॅटोचा उत्पादन खर्च व वाढती रोगराई यांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. 

२००८ नंतर पुन्हा शेतकरी पेरूकडे वळले. परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल झाला. देशी पेरूची जागा कलमी झाडांनी घेतली. त्यामध्ये वेगवेगळे जाती प्रकार आले. मळी भागात घेण्यात येणारे उत्पादन आता माळावर येऊ लागले. सध्या देशी पेरूसोबत सरदार लखनऊ, सरदार ४९, जी विलास, वन-केजी अशा विविध जाती आल्या. गावामध्ये ६० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरूची लागवड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेरूचे क्षेत्र असणारे उमळवाड हे गाव एकमेव आहे. गेली दीड-दोनशे वर्षे पेरूचे गाव उमळवाड ही ओळख कायम ठेवण्यात उमळवाडकर यशस्वी झाले आहेत.

खास चिंचवाडचे दूध 
पूर्वी रेल्वेने कोल्हापूरला जात असताना चिंचवाडचे बाळू गवळी खास उमळवाडच्या शेतकऱ्यांसाठी दुधाची घागर घेऊन येत होते. शेतकरी रेल्वेत जेवत असत. त्या वेळी प्रत्येकाचे दररोजचे रतीब होते. त्यांची आजही आठवण येथील शेतकरी काढतात. 

आमची तिसरी पिढी पेरूचे उत्पादन घेत आहे. आमची देशी पेरूची बाग असून आजही उमळवाडचे पेरू ही ओळख कायम ठेवली आहे. आजही उमळवाडच्या पेरूला बाजारपेठेत मागणी आहे. गावातील शेतकऱ्यांनी पेरूची परंपरा कायम ठेवली आहे. 
- सुनील कामान्ना, 

पेरू उत्पादक शेतकरी

पुरामध्ये होडीतून तोडणी
पूर्वी मळी भागातच सर्व पेरूच्या बागा होत्या. पूर आला की, शेतकरी होडीतून बागांमध्ये जात आणि पेरू तोडून बाजारपेठेला पाठवत.

रेल्वेही होती थांबत
बाजारपेठ कोल्हापूर असल्याने दररोज रेल्वेने प्रवास ठरलेला. काही वेळेला चिखलातून येत असताना उशीर झाला आणि गाडी सुटली तरी रेल्वेचे चालक उमळवाडचा शेतकरी पेरू घेऊन येताना दिसला, की त्याच्यासाठी रेल्वे थांबवित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com