#Specialtyofvillage वैशिष्ट्यपूर्ण खुरप्यांची पाचाकटेवाडी

#Specialtyofvillage वैशिष्ट्यपूर्ण खुरप्यांची पाचाकटेवाडी

शेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे. पाचाकटेवाडीत घडविलेली खुरपे-विळा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील शेवटच्या डोंगरातील पाचाकटेवाडी गाव खुरपे आणि विळ्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज चौथी पिढी शेतकऱ्यांसाठी खुरपे-विळा बनवून शेतीच्या कामांसाठी योगदान देत आहेत. टिकाऊ व दणकट खुरपी-विळा म्हणून पाचाकटेवाडीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकपर्यंत पसरला आहे.

उंच डोंगरावरील पाचाकटेवाडीला पूर्वी वीज, पाणी, रस्ते या सुविधा नव्हत्या. शेतीला जोड व्यवसाय म्हणून सुतार कुटुंबाने खुरपे, विळा निर्मिती सुरू केली. सुरुवातीला धान्य घेऊन (म्हणजे बैतं स्वरूपात मोबदला) शेतकऱ्यांना खुरपे देत होते.
छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधले. जिल्ह्यात शेतजमीन सिंचनाखाली येऊन हरितक्रांती झाली. यामुळे जिराईत जमिनी बागायती झाल्या.

उसाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. या सर्वांबरोबर अवजारे व खुरप्यांची मागणीही वाढू लागली. शेतकऱ्यांसाठी खुरपी-विळा बनवून शेतकऱ्यांच्या प्रगतीत सुतार बंधूंनी हातभार लावला. आजही जिरायत शेती पिकू लागल्याने खुरपे विळ्याची मागणी वाढतच आहे. काही वर्षांपूर्वी फिरून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गरजेनुसार खुरपे बनवून विकले जात होते. टिकाऊ व दणकट खुरपे बनवू लागल्याने शेतकऱ्यांचा विश्‍वास वाढून मागणीही वाढतच गेली आणि पाचाकटेवाडीचा खुरपी-विळा हा ब्रॅंड झाला. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा हा विळा भागीदार ठरला आहे.

जुनी भाता पद्धत जाऊन सध्या सात ते आठ कुटुंबातील चौथी पिढी खुरपे बनवण्याचे काम आधुनिक पद्धतीने करतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्याकडे खुरप्याचा वापर होऊन धार बोथट झाल्यानंतर वर्षाने धार लावणे, पाणी देण्याचे कामही करावे लागते. भांगलण, भात कापणी, ऊस तोडणी यांसह विविध पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गरजेनुसार खुरपे बनवून दिले जाते. जिल्हा व राज्यातील जनावरांचा बाजार गाठून खुरपे विक्रीसाठी ही मंडळी जातात. यांत्रिकीकरणाच्या युगातही खुरप्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ऊस तोडणी, भात कापणी, गवत कापणीचा हंगाम आल्याने सुतार बंधूंची धांदल उडाली आहे.

दिवसभर विस्तवासमोर बसून खुरप्याला आकार देताना घामाच्या धारा वाहतात. खूप मेहनत करून पदरात शे-दोनशे रुपये पडतात. शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, याच पद्धतीने हा व्यवसायही तुटपुंजा मोबदला घेऊन करावा लागतो, अशी खंत सुतार बंधूंनी व्यक्त केली.

शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही. यामुळे आजचा तरुण शेतीत काम करण्यास तयार नाही. शेतीची गळती वाढली, शेती टाकून तरुणाचा लोंढा शहराकडे स्थलांतर 
होत आहे. ही बाब चिंताजनक आहे, अशी खंत सुतार बंधूंनी व्यक्त केली.

व्हॉटस्‌ ॲपवर नोंदणी
सुतार बंधूंनी पाचाकटेवाडीचा विळा असा ग्रुप केला आहे. या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर अनेक शेतकरी खुरप्याची मागणी नोंदवितात. त्यानुसार खुरपे बनवून सुतार देतात.

कोळसा, लाकूड, वीज, पोलादचे दर वाढले. यामुळे खुरप्याचेही दर वाढले. कष्ट व मेहनतीचे काम आहे. दररोज अवघा ३०० रुपये पगार पडतो.
- संजय सुतार

एक विळा बनविण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो. शेतकऱ्याची सेवा म्हणून काम करतो. एक वर्षाची गॅरंटी देतो. दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
-प्रल्हाद सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com