वेग नको गतिरोधक आवरा..! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

सातारा - शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांनी सातारकरांना वीट आणला आहे. मनमानी पद्धतीने व बेकायदेशीरपणे हे गतिरोधक तयार करण्यात आलेत. त्यातील एकाही गतिरोधकाजवळ सावधानतेचा सूचना फलक नाही. त्यामुळे वेग नको पण गतिरोधक आवरा, असे म्हणण्याची वेळ त्रस्त सातारकरांवर आली आहे. सातारा पालिकेकडूनही या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 

सातारा - शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांनी सातारकरांना वीट आणला आहे. मनमानी पद्धतीने व बेकायदेशीरपणे हे गतिरोधक तयार करण्यात आलेत. त्यातील एकाही गतिरोधकाजवळ सावधानतेचा सूचना फलक नाही. त्यामुळे वेग नको पण गतिरोधक आवरा, असे म्हणण्याची वेळ त्रस्त सातारकरांवर आली आहे. सातारा पालिकेकडूनही या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 

शहरात रस्त्याच्या ठेकेदाराने स्थानिक लोकांच्या मागणीनुसार वाट्टेल तेथे गतिरोधक बनवले आहेत. दोन गतिरोधकांमध्ये ठराविक अंतर असावे, याचेही भान हे गतिरोधक उभारताना ठेवलेले दिसत नाही. रविवार पेठ, लोणार गल्लीत सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. सुमारे 200 मीटरच्या रस्त्यावर चार गतिरोधक म्हणजे अवघ्या 50 मीटरवर एक गतिरोधक बनवण्यात आला. हे गतिरोधक कमी म्हणून की काय, याच गल्लीत व्यंकटेश पार्कजवळ एका नागरिकाने चुन्यातून आलेला गाळ-कचरा एकत्र करून गतिरोधक केला आहे. 

अनंत इंग्लिश स्कूल कॉर्नर ते बदामी विहीर या 500 मीटर अंतरात वाट्टेल तसे गतिरोधक बनवले गेलेत. मंगळवार पेठेत खारी विहीर ते दत्त चौक व मनामती चौक ते पत्रेवाला चाळ दरम्यान आठवड्याभरापूर्वी गतिरोधक तयार केले गेले. सदरबझारमध्ये गेल्या वर्षीपासूनच गतिरोधक आहेत. गोडोलीतील बागडेवाड्यानजीक अनिर्बंध गतिरोधक त्रास देत आहेत. काही गतिरोधक ओबड-धोबड, आकाराने मोठे आहेत. चढाच्या रस्त्यावर गतिरोधकावरून वाहन नेताना चालकाला कसरत करावी लागते. छोट्या व कमी उंचीच्या वाहनांचे या गतिरोधकांमुळे नुकसान होत आहे. नवख्या वाहन चालकाला गतिरोधक माहिती नसतो. अशा वेळी त्याचे वाहन हमखास आपटते. 

पालिकेच्या नगर अभियंत्याने शहरातील सर्व गतिरोधकांचे सर्वेक्षण करून आवश्‍यक, अनावश्‍यक गतिरोधकांची माहिती जमा करण्याबाबत अभियंत्यांना सांगितले होते. मात्र, सर्वेक्षणाचा कोणताही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शहरातील रस्त्यांवर दिसून आला नाही. त्याअर्थी नक्की सर्वेक्षण तरी झाले का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

...तर किमान उपाययोजना तरी करा 
गतिरोधकाची उंची किती असावी, दोन गतिरोधकांत अंतर किती असावे, एका रस्त्यावर जास्तीत जास्त किती गतिरोधक असावेत, याबाबत पालिकेने धोरण निश्‍चित करावे. आता आणखी तीन लाख रुपये खर्चून पालिका इतर ठिकाणी रबरी गतिरोधक बसविणार असल्याने साताऱ्याची भविष्यात "गतिरोधकांचे शहर' अशी नवी ओळख निर्माण होऊ शकते. पालिकेला बेकायदा गतिरोधक काढता नाही आले तरी वाहनचालकांच्या जागरुकतेसाठी किमान त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारावेत अथवा गतिरोधकाच्या 400 मीटर आधी सावधानतेचा फलक लावावा, अशी अपेक्षा आहे. 

Web Title: Speedbreaker issue in satara

टॅग्स