जयंतरावांचे अर्धसत्य अन्‌ भाजपच्या विजयाचा अर्थ

जयसिंग कुंभार
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

काँग्रेस आघाडीचा पराभव बंडखोरांमुळे झाला हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधान अर्धसत्यच. त्यांनी याच पत्रकार परिषदेत महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी झाल्यास भाजप अल्पमतात येईल, असेही सांगून टाकले. त्यातून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार करून ही मंडळी भाजपमध्ये गेली आहेत असे सुचवायचे असावे. याचाच असाही अर्थ होतो की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात भ्रष्टाचार झाला. ते आघाडीच्या पराभवाचे कारण आहे, हे मात्र जयंतराव मान्य करीत नाहीत. ते त्यांनी केले असते तर ते निकालाच्या अधिक परिपूर्ण आत्मपरीक्षणापर्यंत पोहचले असते. 
 

महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढल्या असत्या तर पुरती वाताहत झाली असती. त्यात राष्ट्रवादीची अधिकच वाताहत झाली असती. याची सर्वात आधी स्पष्ट चाहूल जयंतरावांना लागली होती. त्यामुळेच उभ्या आयुष्यात कधी नव्हे इतकी राजकीय पडती भूमिका घेत त्यांनी आघाडी घडवून आणली. त्याचवेळी त्यांच्या पूर्ण राजकीय आयुष्यात काँग्रेस आघाडी धर्माचे कधी नव्हे इतके चांगले पालनही त्यांनी केले. त्यांनी राष्ट्रवादीतील विद्यमानांचे भाजपकडील आऊटगोईंग थांबवण्यासाठी आघाडीचे सर्वांत आधी सुतोवाच केले.

सर्व विद्यमानांना उमेदवारी दिली जाईल, असे एकतर्फी सांगूनही टाकले. त्यामुळे राष्ट्रवादीतील आऊटगोईंग रोखले गेले. ‘यापुढे नायकवडी सभागृहात दिसणार नाहीत’ ही भीमगर्जना ते विसरले. नायकवडींच्या घरी गेले. इकडे सुंदोपसुंदी माजलेल्या काँग्रेसमधील सर्व स्वयंघोषित भावी आमदारांची त्यांनी पुढाकार घेऊन मोट बांधली. काँग्रेसमधील अनेक बालकांना त्यांनी आधी महापालिका जिंकुया हे पटवून दिले.

विशाल पाटील कितीही टोचून बोलत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. इतके सारे केल्यानंतर आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत दोन्ही काँग्रेसमधील सर्वच इच्छुकांना त्यांनी गॅसवर ठेवले. इतके करून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत दारे सताड उघडी ठेवून बसलेल्या भाजपच्या गळाला ते लागणार नाहीत याची त्यांनी सोय केली. प्रसंगी ते अपक्ष म्हणून लढले तरी चालतील अशी व्यूहरचना केली.

त्यामुळेच मिरज वगळता सांगलीत भाजपच्या हाताला सांगली-कुपवाडमध्ये पहिल्या फळीतील नग उमेदवार लागले नाहीत. हे सारे जयंतरावांच्या व्यूहरचनेचे यशच. ते मान्यच करायला हवे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीची ३५ जागांपर्यंतची मजलही त्याचेच फलीत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा पराभव केवळ बंडखोरांमुळे झाला हे मात्र अर्धसत्यच. निवडणुकीनंतरच्या या जर तरच्या आकडेवारीला फारसा अर्थ नसतो.

ज्या सभागृहात भाजप शून्यावर होता तिथून भाजपने थेट ४१ जागांवर हनुमान उडी घेतलीय. हे  केवळ आघाडीतील नाराजांच्या बंडखोरीने आणि भाजपच्या चाणक्‍यांची व्यूहरचनेचे यश नव्हे. मात्र तसाच या निकालाचा अर्थ घेतला गेला तर या शहरातील नागरिकांच्या बदलाच्या अपेक्षा-इच्छांकडे साफ दुर्लक्ष करण्यासारखे आहे. इथल्या भ्रष्ट कारभारात बदल व्हावा यासाठी गेल्या पंधरा वर्षांत संधी मिळेल तेव्हा नागरिकांनी पुढाकार घेऊन बदल केला आहे. नव्या पर्यायाचे स्वागत केलेय.

(आठवा.. महाआघाडीच्या प्रारंभ काळातील जयंतरावांची प्रतिमा) सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी असा शब्दप्रयोग करूनही नागरिकांच्या या आकांक्षाकडे दुर्लक्ष करता कामा नये. सांगली आजही नेतृत्वहीनच आहे. ज्यांनी नेतृत्व केले त्यांनी फक्त संस्थानिक नेमून कारभार केला. ना कारभाराला दिशा दिली. नागरिकांसमोर पर्यायच कमी राहतील अशी व्यवस्था आजवर झाली. अगदी परवाच्या निवडणुकीतही. पंचवीस हजार नागरिकांनी नोटाचा पर्याय निवडून निषेध नोंदवला आहे.

भाजपनेही फार काही चांगले पर्याय दिले अशातला भाग नाही. नागरिकांनी याही वेळी एक प्रयोगच केला आहे. यातून काही चांगली निष्पन्न व्हावे अशी मात्र सार्वत्रिक अपेक्षा आहे. या निकालाचे विश्‍लेषण केवळ आकडेवारीच्या निकषावर करीत बसण्यापेक्षा निकालामागचा हा आशय महत्त्वाचा आहे. तो दोन्ही काँग्रेसजनांनी आणि भाजप नेत्यांनी समजून घ्यावा.

इशारा नव्‍हे अनुभव
काँग्रेसी नग आयात केल्यानेच आपण यशस्वी झालो, असे सोपे विश्‍लेषण चाणक्‍यांनी करून घेतले तर भाजपच्या या सत्तेची पुढच्या काळात नक्की महाआघाडी होईल. हा इशारा नव्हे तर अनुभव आहे. महाआघाडीचे घटक असलेल्या चाणक्‍यांना तो नव्याने समजून सांगायची गरज नाही. 
 

Web Title: speical story on Ex Minister Jayant Patil comment