वेतन होऊनही नोकरदारांचे खिसे रिकामेच!

संजय जगताप
बुधवार, 7 डिसेंबर 2016

चलनाअभावी आर्थिक कोंडी; देणेकऱ्यांचा वाढला तगादा, सुट्या नोटांचाही प्रश्‍न
मायणी - नोव्हेंबरचे वेतन बॅंक खात्यावर जमा झाले आहे. पण, बॅंकेत पुरेसे चलन नाही. त्यामुळे मासिक बिले भागवण्यासह दैनंदिन व्यवहार करताना नोकरदारांची कोंडी होऊ लागलीय. पुरेशा चलनाअभावी ग्रामीण भागातील लोकांच्या पाठोपाठ आता नोकरदारांचाही बांध फुटू लागला आहे. कालपर्यंत सरकारच्या निर्णयाचे कौतुक करणारी नोकरदार मंडळी स्वतःची आर्थिक कोंडी होताच सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढू लागल्याचे चित्र आहे.

काळ्या पैशाचे निमित्त पुढे करून सरकारने एक हजार-पाचशेंच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यापूर्वी नोकरदारांनी बॅंकेतून ऑक्‍टोबरचे वेतन काढले होते. त्यामुळे नोटाबंदी निर्णयाची फारशी झळ त्यांना लागली नाही. परिणामी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचे नोकरदारांकडून जोरदार समर्थन करण्यात येत होते. नोटाबंदीवरून ठिकठिकाणच्या कार्यालयांतील नोकरदारांत समर्थक व विरोधक असे दोन गट पडले होते. मात्र, बहुतांश नोकरदार नोटाबंदीचेच समर्थन करीत होते.

दरम्यान, नुकतेच शिक्षक व बहुतांश नोकरदारांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमध्ये जमा झाले आहे. तरीही खात्यावरील पुरेसे पैसे काढता येईनात. त्यामुळे आर्थिक कोंडी होऊन नोकरदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरभाडे, दूध, वर्तमानपत्र, दळण, वीज बिल, किराणा दुकानदार, मुलांचा शैक्षणिक, वाहतूक खर्च आदी मासिक बिले भागवण्याचे संकट नोकरदारांपुढे आहे. बॅंकेतून दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा देणेकरी स्वीकारत नसल्याचे चित्र आहे. बिलापोटी चेक स्वीकारण्यासही सामान्य व्यावसायिक तयार नाहीत. त्यामुळे लोकांना देय असलेली मासिक बिले थकली आहेत. अनेक जण मासिकऐवजी आता दररोज रोखीने वस्तू घेण्याची सूचना करीत आहेत. दररोज तरी कुठून सुटे चलन आणायचे, असा प्रश्न नोकरदारांना सतावत आहे. सुट्या पैशांअभावी आठवडी बाजारातही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरज नसताना अधिक माल खरेदी करावा लागत आहे.

छोटे-छोटे व्यावसायिक असलेल्या देणेकऱ्यांनी नोकरदारांना मासिक बिलांसाठी तगादा लावला आहे. वेतन बॅंक खात्यावर जमा असूनही खिशे रिकामेच असल्याने नोकरदारांना सर्वाधिक मन:स्ताप होत आहे. परिणामी नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतुक करणारे नोकरदार आता गप्प आहेत.

बॅंकेत खात्यावर पैसे असूनही उपयोग नाही. वेतनाची रक्कम काढण्यास कसलेही बंधन नको. कामकाज सोडून पैशासाठी किती वेळा रांगेत उभे रहायचे?
- विठ्ठलराव भागवत, नोकरदार, मायणी

Web Title: In spite of lower wages deep pockets empty!