क्रीडा महोत्सव : सोलापूर विद्यापीठाला दोन सूवर्णपदके 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

हॅंडबॉल : नागपूर विद्यापीठाला रौप्यपदक 
हॅंडबॉल : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हॅंडबॉल स्पर्धेत शनिवारी पुरुषांच्या अंतिम सामन्याची चुरस पाहायला मिळाली. या अंतिम सामन्यात नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संघाला पाच गुणांनी पराभूत करून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अजिंक्‍यपद पटकावले. 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मैदानांवर सुरू असलेल्या क्रीडा महोत्सावाच्या तिसऱ्या दिवशी सूवर्णपदकांचे सोलापूर विद्यापीठचे खाते उघडले. आज झालेल्या मैदानी स्पर्धेतील थाळीफेक स्पर्धेत विद्यापीठाची स्टार खेळडू संतोषी देशमुख हिने वैयक्‍तीकमध्ये पहिले सूवर्णपदक पटकाविले. तर, सांघिकमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या हॉण्डबॉल संघाने सूवर्णपदक पटकाविले. 

हॅंडबॉल पुरुष गटात 12 संघ सहभागी झाले होते. उपांत्य सामन्यात सोलापूरच्या संघाचा सामना शिवाजी विद्यापीठाच्या संघाबरोबर झाला. अटीतटीच्या लढतीत सोलापूरच्या संघाने 41-37 अशा फरकाने म्हणजे चार गुणांनी यात विजय मिळवला. प्रत्येक सामना मोठ्या फरकाने जिंकत सोलापूर संघ अंतिम फेरीपर्यंत आला. अंतिम सामना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमवेत झाला. यात सोलापूरच्या संघाने 24 गुण मिळविले. तर नागपूरच्या संघाला 19 गुण मिळवता आले. यात पाच गोलच्या फरकाने सोलापूर संघाने सामना जिंकत सुवर्णपदक पटकावले. उपविजेत्या नागपूर विद्यापीठास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

Image may contain: 2 people, shoes, basketball court and outdoor

कोल्हापूर विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाने कांस्यपदक मिळवले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, सिंहगड कॉलेजचे सचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, क्रीडा संचालक सुरेश पवार, स्पर्धा समन्वयक डॉ. के. सी. मुजावर, आनंद चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पदक विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. महिलांच्या गटात शनिवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघाने एसएनडीटी मुंबई विद्यापीठाचा 21-3 असा धुव्वा उडवत विजेतेपद मिळवले. मुंबई विद्यापीठाने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठास 10-6 असे हरवले. श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ मुंबई संघाने एसआरटीएम नांदेड संघावर तीन-एक अशा फरकाने विजय नोंदवला. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती संघाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघास 19-17 अशा फरकाने पराभूत केले. महिला गटाचे उपांत्य व अंतिम सामने उद्या (रविवारी) होत आहेत. 

Image may contain: 1 person, playing a sport, shorts, basketball court, shoes and outdoor

ऍथलेटिक्‍समध्ये पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद 
क्रीडा महोत्सवात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संतोषी देशमुख हिने (डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालय, सोलापूर) 43.63 मीटर थाळी फेकून सुवर्णपदक पटकाविले. ऍथलेटिक्‍समध्ये पुणे विद्यापीठाने 142 (12 सुवर्ण) मिळवत सर्वसाधारण विजेतेपद, तर कोल्हापूर विद्यापीठाने 142 गुण (सात सुवर्ण) घेऊन उपविजेतेपद पटकाविले. 

हेही वाच : सोलापूर विद्या पिठला एक रुप्य, करा कांस्य पदक

सोलापूर विद्यापीठाच्या ऍथलेटिक्‍स मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले होते. पुणे व कोल्हापूर विद्यापीठाचे समान गुण झाले. परंतु, पुणे विद्यापीठाने सर्वांत जास्त 12 सुवर्णपदक पटकाविल्याने सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले. पुरुष गटात विजेतेपद मुंबई विद्यापीठाचा कृष्णा सिंगला तर महिला गटात कोल्हापूर विद्यापीठाच्या चैत्राली गुजर हिने विजेतेपद पटकाविले. सोलापूर विद्यापीठाला एक सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्रॉंझपदके मिळाली. 

अंतिम निकाल 
पुरुष गट ः 1500 मीटर धावणे (सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझ) ः शुभम पांढरे (4.05.1 मिनिटे, नाशिक), साईनाथ मोरे (4.06.8, औरंगाबाद), रिलेश मनगळे (4.07.1, कोल्हापूर), महिला ः दुर्गा देवरे (4.42.7 मिनिटे, पुणे), यमुना लडकत (4.47.8 मिनिटे, पुणे), सायली कोकाटेकर (कोल्हापूर, 5.00.8), पुरुष ः तिहेरी उडी ः कृष्णा सिंग (14.81 मीटर, मुंबई), अनिल साऊ (14.58, मुंबई), मुकुल भोईर (14.19, औरंगाबाद), महिला ः प्रगती सपकाळ (11.56 मीटर, कोल्हापूर), श्‍वेता ठाकूर (11.21, मुंबई), उन्नती निखलवार (11.08, नागपूर), महिला ः थाळीफेक ः संतोष देशमुख (43.63, सोलापूर), निशिगंधा मोरे (43.30, कोल्हापूर), प्राजक्ता भोसले (37.96, पुणे), 200 मीटर धावणे ः पुरुष ः प्रतीक पाटील (22.3 सेकंद कोल्हापूर), प्रणव गुरव (22.5, सेकंद), सचिन धोत्रे (22.7, सेकंद, कोल्हापूर), महिला ः कीर्ती भोईटे (25.6 सेकंद, मुंबई), सौरज शट्टी (26.0, मुंबई), स्वप्ना ढमाळे (26.3 औरंगाबाद), थाळीफेक ः पुरुष ः पृथ्वीराज नलवडे (44.62 मीटर, पुणे), सूरज साळुंखे (42.05 कोल्हापूर), जीवन बाचरे (38.09, अमरावती). पुरुष ः 4 बाय 100 मीटर रिले ः मुंबई (43.3 सेकंद), कोल्हापूर (43.8), औरंगाबाद (44,8), महिला ः मुंबई (49.7), कोल्हापूर (50.9), औरंगाबाद (53.4), 4 बाय 400 मीटर ः पुरुष ः कोल्हापूर (3.25.0 मिनिटे), अमरावती (3.30.4 मिनिटे), औरंगाबाद (3.36.8). महिला ः कोल्हापूर (4.08.5), मुंबई (4.11.3), नागपूर (4.25.3). 

Image may contain: 1 person, playing a sport, on stage, child, basketball court and outdoor

व्हॉलिबॉल : सोलापूर विद्यापीठ विजयी 
पुरुषांच्या गटात व्हॉलिबॉल स्पर्धेत रंगलेल्या सामन्यात सकाळच्या सत्रात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने गौंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा 25-17, 25-16 अशा फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संघाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संघाचा 25-15, 25-13 अशा गुणफरकाने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा 25-7, 25-6 गुणाने पराभव करून एकतर्फी विजय मिळवला.

चौथ्या सामन्यात मुंबई विद्यापीठ, मुंबई संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघावर 26-24, 25-19 अशा विजयाची नोंद केली. पाचव्या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संघावर 25-15, 25-16 ने सहज मात केली. सायंकाळच्या सत्रात खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संघाने महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठ, नागपूर संघाचा 25-7, 25-10 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच कायम ठेवली. दुसऱ्या सामन्यात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाचा 25-13, 25-22 अशा गुणांनी पराभव केला. तर तिसऱ्या सामन्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याच्या संघाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संघावर 25-21, 25-18 अशा रोमहर्षक गुणांनी विजय संपादन केला. 

खो-खो : औरंगाबाद, अमरावती उपांत्य फेरीत 
खो-खोत सावित्रीबाई फुले पुणे विरुद्ध मुंबई आणि शिवाजी, कोल्हापूर विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद असे उपांत्य सामने होतील. महिला गटातही पुणे विरुद्ध शिवाजी आणि अमरावती विरुद्ध मुंबई अशा उपांत्य लढती रविवारी सकाळी होतील. शेवटच्या साखळी सामन्यात पुरुष गटात औरंगाबादच्या डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चुरशीच्या सामन्यात यजमान पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर 14-12 अशी 3.50 मिनिटे राखून मात केली. अविनाश देसाई (2.30 मि.व पाच गुण) आणि पियुष घोलप (2.00, 1.00 मिनिटे नाबाद आणि तीन गुण) यांच्या अष्टपैलू खेळामुळे औरंगाबादने मध्यंतरासच 9-7 अशी निसटती आघाडी घेतली होती. ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली.

मध्यंतरानंतर सोलापूरच्या अजय सावंत (1.20, 2.00 मिनिटे व दोन गुण), आकाश हजारे (नाबाद 1.50 मि. व एक गुण), हबीब शेख व अमोल केदार (प्रत्येकी तीन बळी) यांनी दिलेली लढत अपुरी पडली. महिला गटात मात्र सोलापूरने दापोलीच्या डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठावर 16-7 असा एक डाव राखून नऊ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या वैष्णवी लेंडवेने पाच गडी बाद करीत 3.20 मिनिटे संरक्षण केले. वैष्णवी लेंडवेने 2.20 मि. संरक्षण करीत चार गुण मिळवीत संघाच्या विजयात साथ दिली. दापोलीच्या विद्या गुजरने 1.40 व 1.00 मिनिटे संरक्षण व एक गुण मिळवीत एकाकी लढत दिली. दुसऱ्या सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 15-5 असा एक डाव राखून 10 गुणांनी धुव्वा उडविला. त्यांच्या पूजा साळुंकेने आपल्या धारदार आक्रमणात आठ गडी बाद करीत नाबाद 2.20 मिनिटे संरक्षण आणि सुकन्या जाधवने चार गडी बाद करीत 5.00 मिनिटे पळती केली. नाशिककडून प्रियांका पदमे हिने एक मिनिटे पळती व एक गुण मिळविला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports Festival: Two gold medals to Solapur University