पाटाकडील तालीम मंडळाला उत्तम कामगिरीबद्दल चषक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

एकीमच्या पासवर ऋषिकेशने हेडद्वारे गोल केल्यानंतर पाटाकडीलच्या समर्थकांचा आवाज स्टेडियममध्ये दणाणला. नाद खुळा पिवळा-निळाचा जयघोष करण्यात आला. एक गोलने पिछाडीवर पडल्याने खंडोबाने बचावफळी मजबूत केली. चढाया संथ गतीने सुरु असताना खंडोबाच्या अर्जुन शेटगावकरने पाटाकडीलच्या उजव्या बगलेतून पाटाकडीलच्या गोलजाळीसमोर चेंडूचा पास दिला.

कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियममध्ये पाटाकडील तालीम मंडळाने (अ) खंडोबा तालीम मंडळाचा (अ) ४-०ने पराभव करत राजेश चषकावर आपले नाव कोरले. पाटाकडीलच्या खेळाडूंनी चौफेर खेळ करत यंदाच्या हंगामातील दुसरे चषक पटकाविले.

संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते. दुपारी चार वाजता दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर उतरताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन झाले. नगरसेवक अफजल पिरजादे, राहुल चव्हाण, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले उपस्थित होते. मुख्य पंच सुनील पोवार यांनी शिटी वाजवताच सामन्यास सुरवात झाली. खंडोबाच्या विकी शिंदेने फ्री किकवर मारलेल्या चेंडूस खंडोबाच्या खेळाडूने हेडद्वारे गोलजाळीची दिशा दाखवली.

पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल नारायणपुरे याने क्षणाची उसंत न दवडता चेंडू अडवला. लगोलग पाटाकडीलच्या खेळाडूंनी खंडोबाच्या गोलजाळीत शिरकाव केला. पाच मिनिटे चेंडू मैदानात फिरता राहिला. त्यानंतर पाटाकडीलच्या ओंकार पाटीलने उजव्या बगलेतून मारलेला चेंडू खंडोबाच्या गोलजाळीवरुन गेला. ओंकार जाधवच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडद्वारे मारलेला चेंडू खंडोबाच्या वरच्या गोलखांबाला तटला आणि पाटाकडीलच्या समर्थकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. 

एकीमच्या पासवर ऋषिकेशने हेडद्वारे गोल केल्यानंतर पाटाकडीलच्या समर्थकांचा आवाज स्टेडियममध्ये दणाणला. नाद खुळा पिवळा-निळाचा जयघोष करण्यात आला. एक गोलने पिछाडीवर पडल्याने खंडोबाने बचावफळी मजबूत केली. चढाया संथ गतीने सुरु असताना खंडोबाच्या अर्जुन शेटगावकरने पाटाकडीलच्या उजव्या बगलेतून पाटाकडीलच्या गोलजाळीसमोर चेंडूचा पास दिला. चेंडूस ऋतुराज संकपाळने हेड दिली. मात्र, चेंडू गोलजाळीजवळून गेला. लगेचच रणवीर जाधवने काॅर्नर किकवर मारलेल्या चेंडूस पाटाकडीलच्या गोलजाळीत दिशा देण्यास ऋतुराज संकपाळ चकला. या वेळेत पाटाकडीलला मिळालेल्या काॅर्नर किकवर ऋषभ ढेरेने जोरदार फटका दिला. त्यावर नियंत्रण ठेवत फटका मारण्यात पाटाकडीलचे खेळाडू कमी पडले.

गोल करण्यासाठी इरेला पेटलेल्या खंडोबाच्या रणवीर जाधवने डाव्या पायाने मारलेला चेंडू पाटाकडीलच्या गोलजाळीजवळून गेला. पाटाकडीलच्या अक्षय मेथे-पाटीलने खंडोबाच्या गोलक्षेत्र परिसरातून डाव्या पायाने मारलेला चेंडू अडविण्यास विकी शिंदे पुढे सरसावला. पण चेंडू त्याच्या डोक्यावरुन गेला. त्याचा अंदाज गोलरक्षक रणवीर खालकरला आला नाही व चेंडू थेट खंडोबाच्या गोलजाळीत विसावला. 

दोन गोलची आघाडी झाल्याने पाटाकडीलच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. दुखापतीमुळे रणवीर जाधव पूर्वार्धातच मैदानाबाहेर गेल्याने उत्तरार्धात त्याची पोकळी भरुन काढण्याचे आव्हान खंडोबासमोर होते. उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी शाॅर्ट पास देत चढायांची व्यूहरचना आखली असली तरी त्यांच्यातील असमन्वय प्रकर्षाने जाणवला. या वेळेत त्यांच्या दीपराज राऊतला मैदानाबाहेर बोलाविण्यात आले. त्याच्याजागी मिलन वारे मैदानात उतरला. चेंडूवर नियंत्रण ठेवताना त्याचाही कस लागला.

कपिल शिंदे, अर्जुन शेटगावकर, सुधीर कोटिकेला यांचे पायही मैदानात चालले नाहीत. पाटाकडीलच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळावर भर दिला. चढायांचा वेग कमी करत खेळणे याला त्यांनी प्राधान्य दिले. या वेळेत स्टेडियमच्या गॅलरीतील प्रेक्षक उठून जाण्यास सुरवात झाली. पाटाकडीलच्या सैफ हकीमने मारलेला फटका गोलरक्षक रणवीरने तटविल्यानंतर शांत बसलेले प्रेक्षक जागे झाले. त्यानंतर पाटाकडीलच्या अक्षय मेथे-पाटीलने उत्कृष्ट गोलची नोंद केली. याच जागेवरुन रुपेश सुर्वेने गोलची पुनरावृत्ती केली.

Web Title: sports patikadil talim mandal got Sports Cup