लैंगिक अत्याचार प्रकरणी क्रीडा शिक्षकाला आजन्म कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

  • विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडा शिक्षक विजय विठ्ठल मनुगडेला (वय ३७, रा. देवकर पाणंद) न्यायालयाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा. 
  • प्रत्येक गुन्ह्यात एक लाखाचा दंडही
  • जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग २) श्रीमती एस. आर. पाटील यांनी सुनावली ही शिक्षा. 

कोल्हापूर - विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडा शिक्षक विजय विठ्ठल मनुगडेला (वय ३७, रा. देवकर पाणंद)  न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्याला प्रत्येक गुन्ह्यात एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग २) श्रीमती एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. 

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत आजन्म कारावासाची ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा ठरली. गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे कृत्य करणारा मनुगडे राजेंद्रनगर परिसरातील बड्या शाळेतील क्रीडा शिक्षक होता. त्याच्याविरोधात १८ ऑगस्ट २०१७ ला गुन्हा दाखल झाला होता. त्याने केलेल्या या कृत्याचा समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. मोर्चे, आंदोलनेही झाली होती. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पुढे आली होती. सरकारतर्फे ॲड. मंजूषा पाटील व  ॲड.अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकाऱ्यांनी केला. न्यायाधीश आणि वकीलही महिलाच होत्या.

राजेंद्रनगरातील एका शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिंनींना हॉकीचे प्रशिक्षण दिले जात होते. त्या शाळेत मनुगडे १५ वर्षांहून अधिक काळ क्रीडा प्रशिक्षक होता. त्याने शाळेमध्ये १ मे ते १७ ऑगस्ट २०१७ दरम्यान हॉकीचे निवासी शिबिर घेतले होते. या शिबिरात त्याने चार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याची वाच्यता करायची नाही. नाही तर खेळ बंद करू, अशी धमकीही दिली होती. ऐवढ्यावर तो थांबला नाही तर मुलींचा विरोध दिसू लागल्यावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे असेल तर हे सर्व सहन करावे लागेल’ असेही बजावले होते.

भीतीपोटी पीडित मुली घाबरून गेल्या होत्या. त्या शांत शांत राहू लागल्या. त्यांच्या दररोजच्या वागण्या-बोलण्यातला फरक पालकांना जाणवू लागला. त्यामुळे पालकांनी याबाबत त्यांच्याकडे खोदून खोदून चौकशी केली. त्यावेळी मनुगडेच्या कारनाम्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता.

पालकांनी थेट राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी विजय मनुगडेवर १८ ऑगस्ट २०१७ ला शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार व तीन मुलींचा विनयभंग प्रकरणी फिर्याद नोंद झाली. त्याच्यावर कलम ३७६ (२), (एफ) (आय) ३५४ (अ), ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२ चे कलम ३ (ए), ४, ५ (एफ), ६, ७, ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, पीडित मुलींचे करिअरही थांबले होते.

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील, स्मिता काळभोर, सरोजनी चव्हाण, उपनिरीक्षक मीनाक्षी माळी, ज्योती चव्हाण यांनी तपास केला. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग २) एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाली. विशेष सरकार पक्षातर्फे ॲड. मंजूषा पाटील व अमिता कुलकर्णी यांनी बाजू मांडली. ॲड. पाटील यांनी १६ तर कुलकर्णी यांनी १५ साक्षीदार तपासले. यात पीडित मुली, त्यांचे पालक, शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राचार्य, वैद्यकीय अधिकारी, स्कूल बस चालक, प्राचार्य यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. 

न्यायाधीश पाटील यांनी चारही गुन्ह्यात मनुगडेला दोषी ठरवले. याला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची  व प्रत्येक गुन्ह्यात एक लाखांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडित मुलींना देण्याचेही आदेश दिले. तपास कामात तत्कालीन हेड कॉन्स्टेबल संदीप आबिटकर, कॉन्स्टेबल चिले व शिंगे यांचे सहकार्य सरकारी वकिलांना मिळाले. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष
खटल्यात तत्कालीन वैद्यकीय अधिकारी बदली होऊन तेलंगना व चेन्नई येथे गेले आहेत. त्यांची साक्ष न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवली असल्याचे सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी सांगितले. 

चार गुन्ह्यात चार शिक्षा
विजय मनुगडेवर दाखल असणाऱ्या चार गुन्ह्यात चार शिक्षा सुनावण्यात आल्या. लैंगिक अत्याचारात आजन्म कारावास तर विनयभंग प्रकरणी तीन गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला प्रत्येक गुन्ह्या प्रत्येकी एक लाख असा एकूण चार लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम पीडित मुलींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports teacher sentenced to life imprisonment for sexual assault