हा "स्पॉट' मागतो नरबळी...

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

"टोल'चालक कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेल्या 20 वर्षांत चौदा जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. या महामार्गावर "टोल'वसुली करणाऱ्या चेतक एंटरप्रायजेसच्या अधिकाऱ्यांना आत्ता जाग आली.

पारनेर (नगर) : पुणे-नगर महामार्गावर असा एक "स्पॉट' आहे, की जो नरबळी मागतो. आतापर्यंत त्याने चौदा जणांचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे "सकाळ'ने वृत्ताद्वारे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विकासकाला हा "स्पॉट' सापडला आहे. "टोल'चालक कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेल्या 20 वर्षांत चौदा जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. या महामार्गावर "टोल'वसुली करणाऱ्या चेतक एंटरप्रायजेसच्या अधिकाऱ्यांना आत्ता जाग आली.

भर फक्त "टोल'वसुलीवर

नगर-पुणे महामार्गावर अनेक अपघात होतात. कित्येक दिवसांत साइडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी साइडपट्ट्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी साइडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने फक्त "टोल'वसुलीवर भर दिला जातो. स्वतःचा गल्ला कसा वाढेल, यासाठी त्यांचा आटापिटा असतो.

बद्दल "सकाळ'ने आवाज उठविल्यानंतर "चेतक'च्या व्यवस्थापनाला खडबडून जाग आली. कालपासून किमान इशारा देणारे फलक लावण्याची तसदी तरी घेतलेली दिसते. या महामार्गावर अनेक ठिकाणी दुभाजक अनधिकृतपणे तोडले आहेत. त्याचप्रमाणे सुपे गावात, तसेच रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. सुपे व नारायणगव्हाण येथे अद्यापि चौपदरीकरण केलेले नाही.

शाळेजवळ फलकही नाहीत

सुपे एमआयडीसीच्या चौकातील सिग्नल अनेक दिवसांपूर्वी बंद झाला. मात्र, तो सुरू केला गेला नाही. दुभाजक आहे; मात्र तेथे फलक अथवा सिग्नल हवा आहे. या पैकी काहीच उपाययोजना तेथे केल्या जात नाहीत. त्याचबरोबर, ज्या ठिकाणी चौक, गाव किंवा शाळा आहे, तेथे सूचना फलक लावणे बंधनकारक असताना, कंपनी वेळकाढूपणा करीत आहे.

याबाबत परिसरात व महामार्गालगतच्या गावांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत "टोल'वसुली अधिकारी मात्र, "आमच्या हातात काही नाही. वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात. आमचे काम फक्त "टोल'वसुलीचे आहे,' अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. ते अनेकदा अरेरावीसुद्धा करतात.

 

work in progress

बसस्थानक चौकात होणारे अपघात टाळण्यासाठी "सकाळ'च्या वृत्तानंतर "टोल'वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग आली. त्यांनी असे फलक जागोजागी लावण्यास सुरवात केली आहे. (छायाचित्र ः मार्तंड बुचुडे)

"सकाळ'मध्ये रस्त्याच्या दुरवस्थेबाबत "ही वाट जाते यमसदनी...' अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्काळ (सोमवारी व आज) संबंधित ठेकेदाराने "सावधान... या ठिकाणी आजअखेर 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. आपला नंबर पंधरावा हवा आहे का? वाहने सावकाश चालवा व जीवितहानी टाळा' अशा आशयाचे फलक लावून गतिरोधक बनविले आहे. कारण हा वाहनबळीचा "स्पॉट' सुपे चौकात आहे.

सूचना फलक लावणे गरजेचे
"टोल'वसुली करणाऱ्या कंपनीने दुभाजक व ठिकठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे. साइडपट्ट्या भरल्या जात नाहीत. ही कामे डिसेंबरअखेर झाली नाहीत, तर आम्ही एक जानेवारीपासून "टोल'नाका बंद पाडू.
- शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The spot demands victim