पक्षाच्या प्रचारासाठी पाठ्यपुस्तकांचा वापर - आ. डॉ. सुधीर तांबे

sudhir-tambe
sudhir-tambe

आश्वी : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण झाला आहे. दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिवसेना भाजपाचे गोडवे गाण्यात आले असून, काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षांवर टीका करण्यात आली आहे. भाजपा सरकारच्या या कारभारावर काँग्रेसचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भाजप सेनेची नीतीमत्त घसरल्याची टीका केली आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद आता शालेय अभ्यासक्रमात उमटू लागल्याचे दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात दिसून येत आहे. दहावीसाठी यावर्षी प्रथमच राज्यशास्त्र या विषयाचा समावेश करण्यात आला असून, यातील एका धड्यात भाजपा आणि शिवसेनेचे कौतुक करणारी माहिती देण्यात आली आहे. भाजपा हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा पक्ष आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे, असा उल्लेख पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. तसेच शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष असून त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेबाबत माहिती देताना भगव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. 

घराणेशाही ही लोकशाहीसमोरील मोठी समस्या आहे का, असा प्रश्न पुस्तकात विचारुन, याद्वारे काँग्रेसला चिमटा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यावरुन भाजपावर टीका करताना म्हणाले की, पाठ्यपुस्तकात विविध राजकीय पक्षांचा परिचय करून देत असताना सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असून, इतर पक्ष चुकीचे आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 

या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची नीतीमत्ता घसरल्याने, ते आता पाठ्यपुस्तकाचा वापर स्वतःचा प्रचार करण्यासाठी करीत आहेत. इतिहासाचा अभ्यासक्रम बदलून, बुरसटलेली विचारसरणी लोकांच्या मनावर थापण्याचा प्रयत्न चालू आहे. शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या व्यवस्थेचा अश्या पद्धतीने राजकीय हेतूने वापर करणे हे अत्यंत गंभीर असून, देशाच्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com