काँग्रेसचे सरकार मित्रांनीच पाडले: पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

गेल्या विधानसभेला केवळ 31 टक्के मते घेणारे भाजप आमच्यातील दुफळीने सत्तेत आल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. "निवडणुकीत आम्ही 35 टक्के मते घेऊनही एकमेकांच्या विरोधात लढल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी आज विरोधात आहे. मुळात आमचे म्हणजे कॉंग्रेसचे सरकार पडले नाही ते पाडले गेले. मित्रांनी ऐनवेळी आमचे सरकार पाडले.

श्रीगोंदे - "गेल्या वेळी आमचे सरकार पडले नव्हते, तर मित्रांनीच ते पाडले होते. हे लोकांना माहिती नाही,' असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज करत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाना साधला. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या भाजपचे सरकार पुन्हा येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन मेळावा आज श्रीगोंदे फॅक्‍टरी येथे झाला. या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी नागवडे यांच्या कार्याचा गौरव करताना भाजपवर टीका केली. ""नागवडे यांना साखर कारखानदारी कशी काटकसरीने चालवायची याचे परिपक्व ज्ञान आहे. मात्र सध्याच्या भाजप सरकारच्या सहकारविरोधी धोरणामुळे हा नेता झाकाळला जात आहे. केवळ घोषणा करून सत्तेवर आलेल्या या सरकारने कुठलेच आश्वासन पाळले नाही. पण त्यामुळे जातीय दंगलीचे विष पेरण्याचे उद्योग सुरू झाले असून, लोकांमध्ये धार्मिक तणाव निर्माण करून सत्ता पुन्हा मिळविण्याचे धोरण घेतलेल्या भाजपने पहिला ट्रेलर कोरेगाव भीमामध्ये दाखविला आहे,'' असे चव्हाण म्हणाले.

गेल्या विधानसभेला केवळ 31 टक्के मते घेणारे भाजप आमच्यातील दुफळीने सत्तेत आल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. "निवडणुकीत आम्ही 35 टक्के मते घेऊनही एकमेकांच्या विरोधात लढल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादी आज विरोधात आहे. मुळात आमचे म्हणजे कॉंग्रेसचे सरकार पडले नाही ते पाडले गेले. मित्रांनी ऐनवेळी आमचे सरकार पाडले.

लोकांना हे माहिती नव्हते. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कॉंग्रेसचे म्हणजे शेतकऱ्यांचे सरकार येईल,' असे ते म्हणाले.

Web Title: srigonde nagar news prithviraj chavan statement