अखेर राजेंविरोधात श्रीनिवास पाटीलच लढणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

श्री. पाटील हे गुरुवारी (ता. 3) साताऱ्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 
 

सातारा : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अखेर माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नकार आल्याने राष्ट्रवादीने आज उमेदवारी जाहीर केली. आता उदयनराजे व श्रीनिवास पाटील अशी लढत पाहायला मिळेल. श्री. पाटील हे गुरुवारी (ता. 3) साताऱ्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेसोबतच पोटनिवडणूक होत आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल याचे तर्कवितर्क वर्तविले जात होते.

त्यासाठी राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांची नावे चर्चेत होती; पण सक्षम आणि दमदार उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, सर्वसमावेशक आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणारा उमेदवार म्हणून पृथ्वीराजबाबांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आग्रही होते. अगदी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून श्री. चव्हाण यांनी उमेदवारी स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड दक्षिणला संवाद मेळावा घेऊन श्री. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यात बहुतांश सर्वच कार्यकर्त्यांनी पृथ्वीराजबाबांनी कऱ्हाड दक्षिणमधूनच लढावे, असा आग्रह धरला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी काल (ता. 30) विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. लोकसभा लढणार नसल्याचेही शरद पवारांच्या त्यांनी कानावरही घातले. त्यामुळे रात्री उशिरा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुळात राष्ट्रवादीकडून लोकसभा लढण्यासाठी श्रीनिवास पाटील हे इच्छुक होते. मात्र, शरद पवारांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत ते होते. अखेर त्यांनी श्रीनिवास पाटील यांना ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे भाजपचे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील अशी लढत होणार आहे. 

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने श्रीनिवास पाटील हे गुरुवारी साताऱ्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srinivas Patil will contest against udayanraje