दहावीच्या परीक्षेसाठी बहुसंच ऐवजी एकच प्रश्‍नपत्रिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पाठांतराला वाव नाही 
दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित आशयाचा समावेश केला आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेसाठी काढल्या जाणाऱ्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण, अभिव्यक्ती विकास यावर आधारित प्रश्‍नांचा समावेश असणार आहे. मुक्तोत्तरी प्रश्‍नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे मत व्यक्त करता येणार आहे. पाठांतर करून उत्तरे देण्यास आता वाव राहणार नाही, असेही बोर्डाने म्हटले आहे. 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने (बोर्ड) दहावीच्या परीक्षेसाठी ए. बी. सी. डी. या चार प्रकारची बहुसंची प्रश्‍नपत्रिका वापरली जात होती. मात्र, मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. 

दहावीच्या परीक्षेसाठी इंग्रजी, द्वितीय, तृतीय भाषा व गणित भाग एक व दोनसाठी बहुसंची प्रश्‍नपत्रिका 2004 पासून वापरली जात होती. विद्यार्थ्यांचे परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हा पर्याय बोर्डाने निवडला होता. पण, आता बहुसंची प्रश्‍नपत्रिका रद्द करून या सगळ्या विषयांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार जे विद्यार्थी मार्च 2019 मध्ये दहावीची परीक्षा देतील, त्यांना प्रत्येक विषयासाठी एकच प्रश्‍नपत्रिका असेल. मात्र, जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा देत असतील त्यांना बहुसंची प्रश्‍नपत्रिका दिल्या जाणार आहेत. बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुसंची प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नपत्रिकेची अंमलबजावणी व मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता येण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बहुसंची प्रश्‍नपत्रिका देण्याची आवश्‍यकता नसल्याचा अभिप्राय बालभारती कार्यालयाकडे तज्ञांनी दिला आहे. त्यानुसार बोर्डाने हा बदल केला आहे. 

पाठांतराला वाव नाही 
दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित आशयाचा समावेश केला आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेसाठी काढल्या जाणाऱ्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण, अभिव्यक्ती विकास यावर आधारित प्रश्‍नांचा समावेश असणार आहे. मुक्तोत्तरी प्रश्‍नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे मत व्यक्त करता येणार आहे. पाठांतर करून उत्तरे देण्यास आता वाव राहणार नाही, असेही बोर्डाने म्हटले आहे. 

Web Title: ssc question papers available on online