विद्यार्थ्यांसह पालकांची हाउसफुल्ल गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

कोल्हापूर - विद्यार्थ्यांसह पालकांच्या हाउसफुल्ल गर्दीत आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली. परीक्षा केंद्रावर पालकांची इतकी गर्दी झाली, की परीक्षा विद्यार्थ्यांची आहे की पालकांची, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला. पहिल्या दिवशी विद्यार्थी मराठी विषयाच्या पेपरला सामोरे गेले. पेपरची वेळ सकाळी अकराची होती तरी दहाच्या सुमारास विद्यार्थी आणि पालक केंद्रावर पोचले. 

विद्यार्थ्यांपेक्षा पालकांच्या चेहऱ्यावर अधिक तणाव दिसत होता. आई-वडील दोघेही पाल्यास घेऊन शाळेत पोचले. प्रत्येक केंद्रावर बैठक व्यवस्थेची माहिती आणि कोणत्या खोलीत क्रमांक आहे, याची माहिती देण्यात आली. घाईगडबडीने आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकही नेमकेपणाने माहिती देत होते. साडेदहाच्या सुमारास विद्यार्थी वर्गात जाऊन बसले तरी पालकांचा पाय काही निघेना. अकराची बेल झाल्याशिवाय हलायचे नाही, असा चंग त्यांनी बांधला होता. शिक्षक सातत्याने पालकांनी शाळेचा आवार सोडा, असे सांगत होते; मात्र वर्गात विद्यार्थी पोचत नाही आणि गॅलरीत येऊन हात दाखवत नाही, तोपर्यंत पालकही बाहेर पडत नव्हते. 

बारावीचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याने विभागीय परीक्षा मंडळाने दहावीच्या परीक्षेला काळजी घेतली आहे. कस्टोडियनच्या ताब्यात प्रश्‍नपत्रिका असतात. दहा वाजून पन्नास मिनिटांनी प्रश्‍नपत्रिका वर्गात पोचल्या. अकरा वाजताच पर्यवेक्षकांनी गठ्ठा फोडला. बारावीला पावणेअकराच्या सुमारास पेपर व्हायरल झाला. त्यामुळे या परीक्षेला अकरालाच गठ्ठा फोडण्याचा निर्णय मंडळाने घेतला. 

अकराची बेल झाली आणि मग पालक बाहेर पडू लागले. परीक्षा केंद्राच्या बाहेर दुचाकींची गर्दी झाली. परीक्षेचा पहिला दिवस असल्याने पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. 

नेहमीचा उद्योग- व्यवसाय, नोकरी बाजूला ठेवून पालकांनी पाल्यांसाठी वेळ काढला. सव्वाअकराच्या सुमारास शाळांचा आवार मोकळा झाला. मुख्य फाटक बंद झाल्यानंतर आतमध्ये "पंछी भी पर नही मार सकता' इतक्‍या शिस्तीत परीक्षेस सुरवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास पेपर सुटल्यानंतर पहिला पेपर सोडविल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता. कोल्हापूर विभागातून यंदा एक लाख 52 हजार विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात आहेत.

Web Title: ssc student