दहावीत कमी मार्क मिळाल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

याबाबत अधिक माहिती अशी, हरिपूर रोडवर असलेल्या गजानन कॉलनीत महालक्ष्मी बिल्डींगमध्ये साहिल आई वडिलांसोबत रहात होता. त्याचे वडील सोनारकाम करतात. साहिल इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. काल दहावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परिक्षेत त्याला 53 टक्के मार्क मिळाले होते.

सांगली : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होवूनही कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. साहिल उदय कोलवेकर (वय 15, रा. गजानन कॉलनी हरिपूर रोड, सांगली) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हरिपूर रोडवर असलेल्या गजानन कॉलनीत महालक्ष्मी बिल्डींगमध्ये साहिल आई वडिलांसोबत रहात होता. त्याचे वडील सोनारकाम करतात. साहिल इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. काल दहावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परिक्षेत त्याला 53 टक्के मार्क मिळाले होते. त्यामुळे तो हरिपूर रोडवरील बागेतील गणपतीचे दर्शन घेऊन आला. पेढे वाटून आनंदही व्यक्त केला. मात्र मार्क कमी पडले म्हणून तो निराश होता. त्यातूनच काल रात्री दहाच्या सुमारास आईवडील घराबाहेर बसले असताना तो आत गेला. खोलीतील पंख्याला ओढणीने बांधून त्याने गळफास घेतला.

मात्र हा प्रकार बराचवेळ बाहेर बसलेल्या आई वडिलांना कळली नाही. ते आत गेल्यावर त्यांना साहिलने गळफास लावून घेतल्याचे दिसताच धक्का बसला. त्यांच्या आक्रोशानंतर आजुबाजूचे नागरिक गोळा झाले. त्यांनी साहिलला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी त्याला मयत झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे त्याच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला. तर उत्तीर्ण होवूनही कमी मार्क पडल्याच्या नैराश्‍याने साहिलने असे अघटितपणे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

Web Title: ssc student suicide in Sangli