एसटीची १० टक्के सवलत योजना बंद

संतोष भिसे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मिरज - ‘एस.टी.’ प्रवाशांत लोकप्रिय ठरलेली दहा टक्के सवलत कार्ड योजना शनिवारी (ता. २२) बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे. ‘एसटी’चे चाक दिवसेंदिवस तोट्यात रुतत चालले असताना अशी योजना बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 

मिरज - ‘एस.टी.’ प्रवाशांत लोकप्रिय ठरलेली दहा टक्के सवलत कार्ड योजना शनिवारी (ता. २२) बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे. ‘एसटी’चे चाक दिवसेंदिवस तोट्यात रुतत चालले असताना अशी योजना बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 

२००३ पासून १३ वर्षे ही योजना सुरू होती. त्याअंतर्गत वर्षाकाठी दोनशे रुपयांचे कार्ड दिले जायचे. त्यानंतर वर्षभर महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या साध्या गाडीतून कोठेही प्रवास करताना तिकीट दरात १० टक्‍क्‍यांची सवलत मिळायची. प्रवाशाचा दीड लाखांचा अपघात विमाही उतरवण्यात येत होता. १८ किलोमीटरपेक्षा लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना योजना लागू होती. १४ वर्षांत राज्यात लाखो प्रवाशांनी लाभ घेतला. शनिवारी (ता. २२) ती बंद करण्यात येत आहे, असे पत्र आगारांना देण्यात आले आहे.

महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की २२ एप्रिलपासून नवे कार्ड देण्यात येऊ नये. जुन्या कार्डांचे नूतनीकरण करू नये. शिल्लक असणारी सर्व कार्डे विभागीय लेखा अधिकाऱ्यांकडे जमा  करावीत. २२ एप्रिलपूर्वी जारी केलेली सर्व कार्डे त्यांची मुदत संपेपपर्यंत वैध राहतील. त्याद्वारे प्रवाशांना १० टक्के सवलत मिळत राहील. आता योजना बंद करण्यात आल्याने हक्काचा प्रवासी ‘एसटी’ गमावत असल्याची प्रतिक्रिया आहे. दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, व्यापारी व व्यावसायिकांत योजना लोकप्रिय होती. एसटीला मारक असलेल्या  अवैध प्रवासी वाहतुकीवर ही योजना काही प्रमाणात नामी उपाय होती. योजना बंद करण्यापूर्वी कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. अनेक प्रवासी वंचित राहिलेत. 

राज्यात ३० विभाग आणि २५० आगारांच्या माध्यमातून अडीच-तीन लाख प्रवासी लाभार्थी होते. योजना बंद करताना पर्यायी कोणतीही योजना महामंडळाने सुरू केलेली नाही. 

शनिवारपासून योजना बंद करावी, असे पत्र मिळाले आहे. मिरज आगारात महिन्याकाठी ४० ते ५० कार्डधारकांची नोंद होत असे. योजना बंद झाली असली तरी जुन्या कार्डधारकांना मुदत संपेपर्यंत लाभ मिळत राहील.
- रवींद्र थलवर, व्यवस्थापक, मिरज आगार (एस.टी.)

Web Title: st 10 percent concession scheme close