एस.टी. अपघातात १३ प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

बाजार भोगाव - पन्हाळा तालुक्‍यातील वाशीहून कोल्हापूरकडे येणाऱ्या वाशी-रंकाळा एस.टी. बसचे कमानपाटे तुटल्याने पोहाळे तर्फ बोरगावजवळ ती अपघातग्रस्त झाली. अपघातात दोन महिन्यांच्या बाळासह तेरा जण जखमी झाले. डोक्‍याला मार लागलेल्या दोघींची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी सातच्या सुमारास पोहाळे-साळवाडी दरम्यानच्या चक्री वळणावर ही दुर्घटना घडली. 

आज सकाळी वाशी-रंकाळा एस.टी. बस (एमएच १२ सीएच ७८७३) घेऊन चालक युवराज मारुती पोवार (रा. देवाळे, ता. करवीर) वाशीहून कोल्हापूरकडे चालले होते. पोहाळे व साळवाडी दरम्यानच्या घसरणीवरील चक्री वळणावर एस.टी.चे कमानपाटे तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. तरीही चालकाने एस.टी. डाव्या बाजूच्या नाल्यात नेली व नाल्याच्या बांधावरील झाडाला धडकून थांबवली. अचानक धक्‍क्‍यामुळे बेसावध प्रवाशांची डोकी आजूबाजूला आपटली. नाक, तोंड व हातापायांनाही जखमा झाल्या. काही दुचाकीस्वारांनी जखमींना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी बाळकाबाई बारकू पाटील (वय ४०, रा. मानवाडपैकी आढाववाडी), वालुबाई यशवंत चव्हाण (मानवाड) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यासह मानवाडच्याच सुरेखा बाजीराव खापणे व त्यांचा दोन महिन्यांचा मुलगा विराज बाजीराव खापणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार करून घरी सोडलेले जखमी असे ः विकास सतीश खापणे (मानवाड), मंगल श्रावण चव्हाण, शेवंता आनंदराव जाधव (वाशी),  रणजित गुंडा करले (पिसात्री), धनाजी सखाराम शिंदे, उत्तम गणपती पाटील (बाजार भोगाव), हौसाबाई बाजीराव कांबळे, बाजीराव कृष्णा कांबळे (कसबा बावडा), विजय प्रशांत शिंदे (पन्हाळा). दरम्यान, चालक युवराज पोवार यांनी कळे पोलिसांत अपघाताची वर्दी दिली.

आमदार नरकेंची बांधीलकी
अपघाताचे वृत्त समजताच आमदार चंद्रदीप नरके व पन्हाळा पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. जखमींची विचारपूस करून उपचारासाठीची तातडीने कार्यवाही होईपर्यंत ते तेथेच थांबले.

Web Title: S.T. 13 passengers were injured in the accident