एसटी महामंडळाकडून खासगी कंपन्यांच्या एजंटांना तिकीट विक्रीची परवानगी

एसटी महामंडळाकडून खासगी कंपन्यांच्या एजंटांना तिकीट विक्रीची परवानगी

कोल्हापूर - एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची चर्चा सुरू असताना एसटी महामंडळाने खासगी कंपन्यांच्या एजंटांना तिकीट विक्रीची परवानगी दिली आहे. कोल्हापूर-सांगली व इचलकरंजी मार्गावर ही सेवा सुरू होत आहे. यातून प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळेल, असा दावा एसटी महामंडळाने केला आहे; मात्र एसटी वाहकांना सोडून खासगी एजंटांची नियुक्ती करणे हे एसटीच्या खासगीकरणाचे पाऊल असल्याबद्दल कामगारांत नाराजी आहे. 

महामंडळाच्या निर्णयानुसार राज्यभर अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी ट्रायमॅक्‍स या खासगी कंपनीला ठेका दिला आहे. त्यांचे प्रतिनिधी एसटी व शिवशाही गाड्या ज्या मार्गावर धावतात, त्या मार्गावर चौकात किंवा गावाबाहेर प्रवासी गोळा करून त्यांना एसटीची तिकिटे देतील. त्याची सुरुवात पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, नाशिकसह कोल्हापुरातही झाली आहे.

खासगी तिकीट सेवा अशी... 

  •  कोल्हापूर-सांगली, इचलकरंजी मार्गावर सेवा
  •  प्रवाशांना जागेवर तिकीट
  •  तिकीट विक्रीवर कमिशन
  •  ट्रायमॅक्‍स या खासगी कंपनीला ठेका
  •  पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिकसह कोल्हापुरात सेवा

कोल्हापुरातून शिवशाही बस सुटली, की पेठ नाका, तावडे हॉटेल येथे शिवशाहीने पुढे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी खासगी एजंट बसवले आहेत. त्यांच्याकडून तिकिटे घेऊन प्रवाशांना पुढील प्रवास शिवशाहीने करता येतो अशी ही सेवा आहे.  त्याच धर्तीवर कोल्हापूर-सांगली व इचलकरंजी मार्गावर विनावाहक एसटी बससेवा आहे.

मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांना तिकीट देऊन गाडीत बसविले, की गाडी थेट सांगली, इचलकरंजीत प्रवाशांना सोडते. याच गाड्यांसाठी आता तावडे हॉटेल येथे अन्य एका ठिकाणी खासगी एजंट तेथून पुढे प्रवास करणाऱ्यांना तिकिटे देईल, ते प्रवासी पुढील प्रवास करतील. या एजंटांना तिकीट विक्रीवर कमिशन देण्यात येणार आहे. म्हणजे एसटीच्या महसुलातील काही वाटा खासगी एजंटांकडे जाणार असल्याने एजंट नियुक्ती केल्याबद्दल नाराजी व्यक्‍त होत आहे.  

‘‘ प्रवाशांना शहरात येण्यापेक्षा त्यांच्या गावाजवळ तिकीट मिळावे, एसटीला महसूल मिळावा यासाठी ही सोय आहे. एसटी मुख्यालयाच्या सूचनेनुसार ही सुविधा केली आहे. त्यासाठी खासगी कंपनीचे प्रतिनिधी यांची पूर्णतः ओळख घेऊन त्यांना नियुक्ती दिली आहे. ते फक्त एसटी महामंडळाचीच अधिकृत तिकिटे विकतील. त्यांच्यावर वाहतूक विभागाचे नियंत्रण असेल. काही शंका असल्यास जवळच्या आगारात माहिती घ्यावी.’’    
- शिवराज जाधव,
वाहतूक अधिकारी.
 
‘‘खासगी एजंटांकडून तिकीट बुकिंगच्या पद्धतीला आमचा विरोध आहे. खासगी एजंटांमुळे एसटीच्या विश्‍वासाला व आत्मीयतेला तडा जाऊ शकतो. एसटीने असा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, याबाबत निर्णय घेण्यासाठी ९ डिसेंबरला बैठक घेणार आहोत.’’ 
 - संदीप शिंदे
, राज्याध्यक्ष, एसटी मान्यताप्राप्त संघटना 

९ ते १० लाख खासगी कंपनीला द्यावे लागणार
राज्यभरात पहिल्या टप्प्यात दीडशेवर खासगी एजंटांची नियुक्ती झाली, तर प्रत्येकासाठी दिवसाला दोनशे रुपये कमिशन गेले, तरी महिन्याकाठी ९ ते १० लाख रुपये खासगी कंपनीला द्यावे लागणार आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com