एसटी देणार पॉकेटमनी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

कऱ्हाड - एसटीच्या कामागारांच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन मुलांसाठी पॉकेटमनी म्हणून दरमहा 750 रुपये देण्यात येतील. मुलांना शिक्षणासाठी महामंडळ बिनव्याजी कर्ज देईल आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांची फी महामंडळ भरेल आदी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केल्या. एसटी कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलचीही सोय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

कऱ्हाड - एसटीच्या कामागारांच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन मुलांसाठी पॉकेटमनी म्हणून दरमहा 750 रुपये देण्यात येतील. मुलांना शिक्षणासाठी महामंडळ बिनव्याजी कर्ज देईल आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांची फी महामंडळ भरेल आदी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केल्या. एसटी कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलचीही सोय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

येथील नूतन बस स्थानक इमारतीचे उद्‌घाटन श्री. रावते यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, एसटीचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो उपस्थित होते. रावते म्हणाले, ""कऱ्हाडच्या नूतन बस स्थानकाची वास्तू ही शासनाच्या निधीतून उभी राहिलेली राज्यातील पहिली वास्तू आहे. एसटीच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण आहे. त्याचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांचेच आहे. मीही बाबांच्या कामांचा आदर्श घेऊन बीओटी बंद करून एसटीमार्फत इमारती उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महामंडळाच्या पैशाला हात न लावता इतर निधी उभारला आहे. सध्या 98 नवीन बस स्थानकांचे काम सुरू असून, त्यासाठी 80 अभियंते नेमलेत. सध्या 113 ठिकाणी बस स्थानकाच्या कपाउंडचे बांधकाम सुरू आहे. हुतात्मा सैनिकांच्या पत्नींसाठी मोफत बस पास देऊन त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची सोय केली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 125 कोटींचा बोजा सोसून मोफत पास देण्याचा निर्णय घेतला.'' 

श्री. चव्हाण म्हणाले, ""यशवंतराव चव्हाणांची आठवण चिरंतन राहावी, या हेतूने कऱ्हाडच्या बस स्थानक इमारतीसाठी निधी दिला. बस स्थानकात सुरक्षितेसाठी सीसीटीव्हीची गरज आहे.'' साताऱ्याच्या बस स्थानकाचेही काम मार्गी लावावे, अशी मागणी उदयनराजेंनी केली. या वेळी श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील यांचीही भाषणे झाली. 

उदयनराजे आल्यामुळे... 
श्रीनिवास पाटील हे नेहमी मिश्‍कीलपणे बोलतात. मात्र, आजच्या कार्यक्रमात ते फार कमी मिश्‍कील बोलले. कदाचित उदयनराजे आल्यामुळेच ते कमी मिश्‍कील बोलले असावेत, अशी मिश्‍कील टिप्पणी श्री. रावते यांनी केली. 

रावतेंकडून अमित शहा बेदखल 
लातूरमधील कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसंबंधी केलेल्या वक्तव्याबद्दल दिवाकर रावते यांना समाचार घेतला. "कोण अमित शहा, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी पत्रकारांना केला. भाजपचे ते अध्यक्ष आहेत का? असा प्रतिप्रश्‍न करून शहांना बेदखल केले. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या दिलेल्या नाऱ्याबद्दल विचारले असता श्री. रावते यांनी ""मुख्यमंत्र्यांनी काय नारा दिला आहे. ते मला माहीत नाही. मी काय मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी नाही. मात्र, शिवसेनेने कधीच स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. त्यात नवीन काहीच नाही.''

Web Title: ST give Pocket Money