हात दाखवूनही थांबेना लालपरी

ST
ST

सोलापूर - खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करणाऱ्या लालपरीच्या उत्पन्नात घट होत आहे. मागील काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ खड्ड्यातच जात असल्याचे चित्र आहे. यंदा महामंडळाच्या उत्पन्नात सुमारे ६४३ कोटींची घट झाली असतानाच त्यात वाढ व्हावी म्हणून महामंडळाने तीन वर्षांत कोणतीच मोहीम राबविलेली नाही. तरीही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांकडे बोट केले आहे.

हात दाखवा अन्‌ बस थांबवा, हे ब्रीदवाक्‍य घेऊन प्रवाशांची सेवा करणारी लालपरी आता हात दाखवूनही थांबतच नसल्याचा अनुभव अनेक प्रवाशांना येऊ लागला आहे. बसमध्ये मोजकेच प्रवासी अथवा वाहक व चालकांशिवाय कोणीच नसतानाही लालपरीचा वेग कमी झालेला दिसत नाही. विभाग नियंत्रकांनी कारवाईचा इशारा देऊनही परिस्थिती सुधारत नसल्याची चर्चा आहे. अनेक बसगाड्यांत अस्वच्छता पाहायला मिळते तर काही गाड्यांच्या काचा व आसने तुटलेली आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांनी खासगी वाहनांतून प्रवास करणेच पसंत केले आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची वेतनवाढीसाठी झालेली आंदोलने, इंधन दरवाढीचाही फटका महामंडळाला बसल्याचे सूत्रांनी सांगितले. एक लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा संसार महामंडळाच्या माध्यमातून सुखाचा सुरू आहे, मात्र दिवसेंदिवस या लालपरीची अवस्था बिकट होत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्‍त केली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसह अन्य सवलतींच्या माध्यमातून सरकारकडून मिळणाऱ्या एक हजार ४०० कोटींच्या मदतीतून लालपरीची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, अवैध प्रवासी वाहतूक वाढली असतानाही संबंधित यंत्रणेकडून काहीच कारवाई होत नसल्याचाही फटका लालपरीला बसत असल्याचे दिसून येते.

राज्याची स्थिती...
एकूण बस : १८,५००
कर्मचाऱ्यांची संख्या :१,०७,०००
शासनाकडून मिळणारी वार्षिक रक्‍कम १४,०० कोटी
उत्पन्नात घट : ६४३ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com