सिद्धनेर्लीतील अंगणवाडीला एसटीचा ‘लूक’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

अशी आहे हायटेक अंगणवाडी
२१ वर्षे समाजमंदिरमध्ये भरणाऱ्या या अंगणवाडीत बालचमूंसाठी बोलक्‍या भिंती, खेळणी, शैक्षणिक साहित्यासह मनोरंजनातून शिक्षण दिले जाते. स्वयंपाक गृह, स्वच्छतागृहासह स्टोअर रुमचाही समावेश आहे. शिवाय किशोरींसह गरोदर व स्तनदा मातांसाठी उपयुक्त पुस्तकेही उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पाच मुले नव्याने इथे दाखल झाली आहेत.

सिद्धनेर्ली - येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या इमारतीला रंगकाम करताना एसटीचा लूक दिला आहे. आगळ्यावेगळ्या या कल्पकतेचे मात्र पालकांतून कौतुक होत आहे.  

शिक्षणाच्या या गाडीतून विद्यार्थ्यांनीही सुसाट प्रवास करावा, असा संदेशच जणू सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीने दिला आहे.  ग्रामपंचायतीच्या १४व्या वित्त आयोग व महिला बालकल्याण विभाग यांच्या सहकार्यातून गावाच्या मध्यभागी असणारी अंगणवाडी क्रमांक ३८ व २६७ यांचे सुशोभीकरण व रंगरंगोटीचे काम सुरू होते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी या शाळेत यावेत व त्यांना या शाळेचे आकर्षण निर्माण व्हावे, शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने या शाळेला एसटीचा लूक देण्याचा निर्णय झाला व अंमलात आला. त्यामुळे खरोखरच एसटी थांबली आहे, असा भास होतो.

या अंगणवाडीत शिकणारे जवळपास ५० विद्यार्थी खुल्या वातावरणात या एसटीत बसून आनंदाने शिक्षणाचा आनंद घेत आहेत. शाळेच्या आतील भागातही विविध सोयी-सुविधा केल्या आहेत. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अशा नवनव्या कल्पना अमलात आणून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहेत. अशातच या मराठी शाळेने केलेल्या या कल्पनेचे कौतुक होत आहे. सरपंच सुरेखा पाटील, निता पाटील, उपसरपंच कबीर काबंळे, वंदना कांबळे, शुभांगी लोहार, मिनाक्षी कांबळे, राजश्री कांबळे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

अशी आहे हायटेक अंगणवाडी
२१ वर्षे समाजमंदिरमध्ये भरणाऱ्या या अंगणवाडीत बालचमूंसाठी बोलक्‍या भिंती, खेळणी, शैक्षणिक साहित्यासह मनोरंजनातून शिक्षण दिले जाते. स्वयंपाक गृह, स्वच्छतागृहासह स्टोअर रुमचाही समावेश आहे. शिवाय किशोरींसह गरोदर व स्तनदा मातांसाठी उपयुक्त पुस्तकेही उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पाच मुले नव्याने इथे दाखल झाली आहेत.

Web Title: ST look to Anganwadi building