चैत्र पौर्णिमेच्या यात्रेसाठीही एसटी दरात कपात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

कोल्हापूर - फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला सौंदत्ती येथे होणाऱ्या यात्रेसाठीही एसटीच्या दरात आणि खोळंबा आकारात २० टक्के कपात करण्याची ग्वाही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यासंबंधी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांना निवेदन दिले. त्यानंतर रावते यांनी लगेचच होकार दिला. त्यासाठी ३१ जानेवारीपूर्वी गाड्यांचे बुकिंग करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या सौंदत्ती यात्रेसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खोळंबा आकार व एसटीच्या प्रति किलोमीटर दरात २० टक्के कपात केली होती. त्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता. एसटीला घेतल्या जाणाऱ्या खोळंबा आकारात २० टक्के व दरात प्रति किलोमीटरला १० रुपये कपात केली होती. त्यामुळे रेणुकाभक्तांची सुमारे साडेचार हजार रुपयांची बचत झाली. भाविकांनीही एसटी महामंडळाच्या गाड्यांना प्राधान्य दिले होते. 

फेब्रुवारी महिन्यात चैत्र यात्रेसाठीही एसटी महामंडळाने त्याच सुविधा द्याव्यात व खोळंबा आकार व दर आकारणी कमी असावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदनही परिवहन मंत्री रावते यांना दिले. त्याला तातडीने प्रतिसाद देत त्यांनी दरात आणि खोळंबा आकारात २० टक्के कपात करण्याची ग्वाही दिली. 

नुकत्याच झालेल्या यात्रेसाठी सवलत दिल्याबद्दल आमदार क्षीरसागर यांनी श्री. रावते यांचे भाविकांतर्फे आभार मानले. चैत्र पौर्णिमेला सौंदत्ती येथे होणाऱ्या यात्रेला शहरातील कसबा बावडा, कदमवाडी आदी भागासह जिल्ह्यातील लाखो भाविक जातात. ही यात्राही मोठ्या प्रमाणावर भरते. कोल्हापूरच्या स्वाभिमानी रेणुका भक्तांच्या संघटना महाराष्ट्र एसटी प्रासंगिक कराराने घेतात. दिलेल्या सवलतीमुळे आगामी चैत्र पौर्णिमा यात्रेसाठीही महाराष्ट्र एसटीला मागणी वाढत आहे. त्यामुळे या वेळीही सवलत द्यावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी श्री. रावते यांच्याकडे केली. त्यांनी तातडीने मागणी मान्य करत या वेळीही सवलत देण्याची ग्वाही दिली. रेणुका भक्त संघटनांनी ३१जानेवारीपूर्वी गाड्यांचे बुकिंग करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: st rate decrease for chaitra pournima yatra