एसटी कामगारांचे नेते बिराज साळुंखे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

गेले काही दिवस ते मेंदुरोगावरील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होते. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मध्यरात्री कामगारांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली होती.

सांगली : एस. टी. कामगार संघटनेचे विभागिय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे (वय 80) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले. गेले काही दिवस ते मेंदुरोगावरील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होते. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मध्यरात्री कामगारांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली होती.

गुरुवारी (ता. 5 जुलै) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असे कामगार संघटनेचे सचिव विलास यादव यांनी सांगितले. एसटी कामगार संघटनेचे जवळपास 46 वर्षे सलग अध्यक्ष राहिलेले बिराज साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातील एसटीचा प्रसार पाहिला. एसटी कामगार नेते भाऊ फाटक यांच्या बरोबरीने त्यांनी एसटी कामगार संघटनेत प्रवेश केला आणि आयुष्यभर ते एसटी कामगारांच्या हक्कासाठी लढत राहिले. अगदी परवाचा एसटीचा अखेरचा संप काळात ते पहिल्यांदा रस्त्यावर दिसले नाहीत. अन्यथा राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व लढ्यात ते अग्रभागी राहिले. एसटीत कोणतीही नोकरी न करता ते सतत एसटी कामगारांचे नेते राहिले. एसटी कामगारांनीही या नेत्याला त्यांच्या सुख दुःखात सावलीसारखी साथसोबत केली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात मध्यरात्रीपासून शेकडो कामगारांनी इस्पितळाकडे धाव घेतली. आज सकाळीही त्यांची कर्मभूमी राहिलेल्या एसटी कामगार संघटनेच्या कार्यालयापासूनच त्यांची अंत्ययात्रा निघाली. 'साथी बिराज साळुंखे अमर रहे...' च्या घोषणा देत शेकडो कामगार अंत्ययात्रेत सहभागी झाले. 

मुळचे खानापूर तालुक्‍यातील कार्वे गावचे बिराज साळुंखे विद्यार्थी दशेतच मुंबईत गेले. दहा वर्षाच्या वयात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिले. त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेल्या बिराज यांनी आयुष्यभर जातीपलीकडे जाऊन दलित समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढे दिले. मुंबईत विद्यार्थी दशेत असताना कॉ. एस ए डांगे, एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गिरणी कामगार संघटनेत कार्य केले होते. पुढे ते सांगलीला परतले आणि इथले हमाल व इतर असंघटीत कामगारांसाठी झटू लागले. मोलकरणी, काच पत्रा गोळा करणारे, अंगणवाडी सेवक अशा सामान्य असंघटीत वर्गासाठी ते आयुष्यभर झटले. एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यासाठी ते या वयातही त्यांची अखंड भ्रमंती सुरु होती. सीमाप्रश्नाच्या मुद्यावर त्यांनी कॉंग्रेसच्या सचिव पदाचा त्याग करुन ते सीमा आंदोलनात अग्रभागी राहिले. आणीबाणीत त्यांना 19 महिने कारावास झाला. आयुष्यभर त्यांनी समाजवादी विचारावर निष्ठा ठेवून वाटचाल केली. सांगली शहराच्या राजकारणातही ते नागरिक संघटेपासून सक्रीय राहिले. आमदार संभाजी पवार यांच्यासोबत त्यांनी जनता दलासाठी शेकडो प्रचारसभा घेत रान उठवले. निर्व्याज, निरपेक्ष भावनेने त्यांनी सर्वांवर प्रेम केले. चळवळीसाठी त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही. दलितांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले लढले कायमच संस्मरणीय राहतील. जिथे जिथे दलितांवर सवर्णांनी हल्ले केले तेथे तेथे ते निधड्या छातीने पुढे झाले. दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत राहिले. पुर्णवेळ कामगार नेते म्हणून काम करताना त्यांना व्यक्तीगत आयुष्यच उरले नाही. 

 

Web Title: ST worker leader Biraj Salunkhe passed away

टॅग्स