"तूच माझी पिल्लू'मुळे सोशल मीडियावर रातोरात स्टार

अक्षय गुंड
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

⚫ माढा तालुक्‍यातील युवक शुक्राचार्य चौगुलेला मिळाली ओळख 
⚫ पाच महिन्यांत यू ट्यूबवर 24 लाखांहून अधिक लोकांनी पसंती 
⚫ गाण्यामुळे मिळाल्या दोन चित्रपटाच्या ऑफर 
⚫ दोन गाण्यांचे व्हिडीओ दिग्दर्शन करण्याची संधी

माढा (जि. सोलापूर) : आज धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या सवडीनुसार कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. हा छंद जोपासत असताना कोणाला कधी संधी मिळेल हे सांगता येत नाही. अशीच संधी अंजनगाव खेलोबो (ता. माढा) येथील युवकाला मिळाली असून स्वतः व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या एका गाण्यामुळे तो "रातोरात सोशल मीडियाचा सेलिब्रेटी झाला' आहे. शुक्राचार्य चौगुले असे त्या अवलियाचे नाव.

हेही वाचा : महापौरासाठी 'या' महापालिकेत सुरु 'मॅजिक फिगर'चा खेळ 

शुक्राचार्य चौगुले हा अंजनगाव खेलोबोसारख्या ग्रामीण भागातील युवक. परंतु, लहानपणापासून चित्रपटसृष्टीचे आकर्षण. त्यामुळे मी देखील असाच एक कलाकार होणार अशी जिद्द त्याने बाळगली होती. कला क्षेत्राची आवड असल्याने शाळेच्या युवा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, गाणी यात त्याचा अग्रणी सहभाग असे. पुढे कॉलेज झाल्यानंतर घरचे नोकरी कर म्हणून सतत सांगत असत. परंतु, कोणत्याही नोकरीत मन रहावेना म्हणून नोकरीचा नाद सोडत तो चित्रपटसृष्टी क्षेत्राकडे वळला. प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एखादा टर्निग पॉइंट असतो, तसा शुक्राचार्यच्या जीवनात आला. त्याला राम थोरात या गीतकार, संगीतकार मित्राची साथ मिळाली. कारण, त्याने तयार केलेले "तूच माझी पिल्लू' हे गाणे सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालेले होते. परंतु, त्या गाण्याचे चित्रीकरण नव्हते. त्यामुळे शुक्राचार्याने त्या गाण्याच्या व्हिडिओचा निर्माता व्हायचे ठरवले. आणि त्याने या गाण्यात स्वत: मुख्य अभिनेता म्हणून तर मुख्य अभिनेत्री म्हणून वर्षा फुंदे हिला काम करण्यास घेतले. त्याचे चित्रीकरण माढा तालुक्‍यातील अंजनगाव खेलोबा व येवती या खेडेगावातच केल. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर एका म्युझिक कंपनीतर्फे ते व्हिडिओ गाणे प्रसिद्ध केले. त्या गाण्याला तरुणाईने अक्षरशः डोक्‍यावर घेतले. गाण्याला अवघ्या पाच महिन्यांत यू ट्यूबवर 24 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली. टिक टॉक, लाइक, फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिवसाला हजारो पोस्ट पडू लागल्या. 

हेही वाचा : सोलापूरच्या शेतकऱ्यांना थायलंडच्या पेरूचा आधार

तरुणाईच्या मनात "तूच माझी पिल्लू' हे गाणे खूपच बसले. सध्या हे गाणे विविध संगीत टीव्ही चॅनेलवर सुरू आहे. या गाण्यामुळे शुक्राचार्याचे नशीब तर बदललेच, पण त्याला नंतर दोन चित्रपटाच्या ऑफरही आल्या. त्यानंतर "मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' फेम साजन बेंद्रे यांच्या दोन गाण्यांचं व्हिडीओ दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. तसेच "सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का' फेम अजय क्षीरसागर यांनी गायलेलं "पोरगी पटली कनाडी' आणि स्वतः शुक्राचार्य याने गायलेले "घंटा फरक पडत नाय' या दोन गाण्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शुक्राचार्यने त्याचा आवडता छंद जोपसण्यासाठी प्रयत्न केले व संधी मिळताच त्याचे सोने केले. सध्या तो माढा परिसरात लवकरच वेबसिरीज सुरू करून त्याच्यासारख्या या क्षेत्राविषयी आवड असणाऱ्यास सोबत घेऊन काम करणार आहे. त्याच्या कलेबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

हेही वाचा :  #२६/११ : पोलीस सज्ज आहेतच; नागरिकांची राहावे दक्ष
गाण्यासाठी यांचे लाभले सहकार्य 
गाण्याचे शिलेदार गीतकार, संगीतकार राम थोरात असून प्रकाश पवार, शेखर अहिवळे, आकाश भंडारे यांनी गायन केले आहे. दत्तात्रय चौगुले, समाधान देवकते, वैभव गायकवाड, गणेश हागे, सुमित पवार, राम गोसावी, अजय मुळे व बालाजी जाधव यांनी चित्रिकरणाच्या वेळी मदत केली. 

छंद जोपासण्याचा प्रयत्न 
"तूच माझी पिल्लू' हे माझ्या आयुष्यातले पहिले गाणे होते. या गाण्यामुळे रातोरात माझे जीवनच बदलून गेले. मी रातोरात सोशल मीडिया सेलिब्रिटी झालो. यात अनेक जणांनी मला मदत केली. माझ छंद जोपासण्यासाठी मी प्रयत्न करत होतो व मला त्या एका गाण्यामुळे संधी मिळाली. सध्या काही चित्रपटांची ऑफर आहे. 
- शुक्राचार्य चौगुले, युवक, अंजनगाव खेलोबो 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: star on social media