राज्य नाट्य स्पर्धेची घंटा वाजली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नगर जिल्ह्यातील कलाकारांना पुणे-मुंबईच्या तोडीचे घडविले आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने त्यांच्यापर्यंत नाट्य तंत्रज्ञान पोचवावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई यांनी व्यक्‍त केले.

नगर ः राज्य नाट्य स्पर्धेची नगर केंद्रावर घंटा वाजली आहे. पहिल्याच प्रयोगाला नाट्यगृहात मोठी गर्दी झाली होती. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे हे 59वे वर्षे आहे.

नगर जिल्ह्यातील कलाकारांना पुणे-मुंबईच्या तोडीचे घडविले आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने त्यांच्यापर्यंत नाट्य तंत्रज्ञान पोचवावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई यांनी व्यक्‍त केले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आज (शनिवारी) देसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन दीपप्रज्वलन व नटराज पुजनाने करण्यात झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सिने-नाट्य कलावंत क्षितिज झावरे, संजय पाटील, सतीश शिंगटे, प्रा. संजय दळवी, पी. डी. कुलकर्णी, स्पर्धेचे परीक्षक रामदास तांबे, डॉ. पी. एन. कुंदा, श्रीकांत सागर आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, की नगर शहराने राज्यातील नाट्य व चित्रपट क्षेत्राला अनेक नामवंत कलावंत दिले. या नगर शहराशी नाते सांगणाऱ्या ग्रामीण भागातील कलाकारांना बळ मिळणे आवश्‍यक आहे. लाईट, साऊंड सारख्या तांत्रिक गोष्टीतरी शासनाकडून प्राप्त होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सागर मेहेत्रे यांनी शासन दरबारी कलावंतांचे प्रश्‍न मांडावेत. श्रीरामपूरमध्ये गोविंदराव आदिक नाट्यगृहाचे शेवटचे काम बाकी आहे. मात्र, त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याची खंत या वेळी त्यांनी व्यक्‍त केली.

सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. प्रास्ताविक व आभार सागर मेहेत्रे यांनी मानले. श्रीरामपूरमधील स्माइल फाउंडेशनच्या "वादळवेणा' या नाट्यप्रयोगाने स्पर्धेस प्रारंभ झाला. 4 डिसेंबरपर्यंत सायंकाळी आठ वाजता सावेडीतील माऊली सभागृहात ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेत रविवारी नाटके सादर होणार नाहीत.

हे होतील नाट्यप्रयोग
ता. 15 - मरी जाय झो, ता. 16 - वादळवेणा, ता. 18 - मलिका, ता. 19 - रात संपता संपेना, ता. 20 - घुसमट, ता. 21 - शेवंता जित्ती हाय, ता. 22 - एक होता बांबूकाका, ता. 23 - अरे देवा, ता. 24 - अमन या शांती, ता. 25 - रातमतरा, ता. 26 - अजूनही चांदरात आहे, ता. 27 - मिडल स्टीक, ता. 28 - उत्तरायण, ता. 29 - शापित माणसांचे गुपित, ता. 30 - बाईपण, दोन डिसेंबर - गाभण, ता. तीन - जिहाद, ता. चार मोमोज.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state drama competition is start