'दबावाला बळी न पडता मतदान करा '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका निर्भयतेने आणि पारदर्शीपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणेसह पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करून जिल्ह्यात येणारी खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच रेल्वेची कडक तपासणी करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाचा श्री. सहारिया यांनी आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका निर्भयतेने आणि पारदर्शीपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणेसह पोलिसांनी सतर्क राहिले पाहिजे. मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करून जिल्ह्यात येणारी खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच रेल्वेची कडक तपासणी करा, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाचा श्री. सहारिया यांनी आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. 

सहारिया म्हणाले, ""निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेची सर्व यंत्रणांनी सक्षमपणे अंमलबजावणी करावी. मतदारांवर दबाव टाकणे तसेच प्रलोभन दाखविणाऱ्या प्रवृत्तीवर पोलिसांनी व निवडणूक यंत्रणेने अंकुश ठेवावा. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवा. खासगी विमाने आणि हेलिकॅप्टर्स तसेच रेल्वेंची तपासणी जिल्ह्याच्या एंट्री पॉइंटलाच करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. भरारी पथकाबरोबरच स्थिर सर्वेक्षण पथकेही आवश्‍यकतेनुसार वाढविण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली. सोशल मीडियावरून असलेल्या जाहिराती व पोस्टवर जिल्हास्तरीय पथकाने करडी नजर ठेवली पाहिजे. याशिवाय, सोशल मीडियासाठी नेमलेल्या पथकामध्ये सायबर सेल प्रतिनिधीचाही समावेश करण्याच्या सूचना सहारिया यांनी दिल्या. या वेळी अपर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक अजित पवार, नंदकुमार काटकर, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. 

मतदान टक्केवारी वाढवा 
जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी मतदार जागृतीचा प्रभावी कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडिओ पथके, चेक पोस्ट यासारख्या उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले. 

प्रसंगी बॅंकांची मदत घ्या 
निवडणूक काळात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बॅंकांची मदत घ्यावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्‍चिती करून त्या ठिकाणी प्रतीबंधात्मक उपाययोजना राबवा. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे व नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करा, असे आदेशही श्री. सहारिया यांनी दिले. 

शपथपत्राचे फलक 
निवडणुकीमधील उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यातील माहिती देणारे फलक मतदान केंद्रावर उभे करावेत. या वर्षी प्रथमच मतपत्रिकेतील मजकुराचा फॉंट वाढवून 14 ते 16 वरून 24 केला आहे. 

2 हजार 450 मतदान केंद्रे 
21 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 2 हजार 450 मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. तर 21 लाख 38 हजार 80 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी 16 हजार 260 मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून 248 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या वेळी सांगितले. 

जागृती कार्यक्रमावर भर 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रण कक्ष, 40 भरारी पथके, 39 स्थिर सर्वेक्षण पथके, 56 व्हीएसटी पथके आणि 14 व्हीव्हीटी पथके, जाहिरात प्रसारण, सोशल मीडिया तसेच खर्च तपासणी पथके कार्यरत केली असून वाहतूक आराखडा, साहित्य वितरण आराखडा तसेच मतदान जागृती कार्यक्रमावरही अधिक भर दिला असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले. 

सर्व समित्यांचा आढावा 
उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ऑनलाइन नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व समित्यांचा तसेच पथकांच्या कामाचा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आढावा घेतला. 

प्रक्रियेची घेतली माहिती 
तुम्ही अर्ज कोठून भरला? ऑनलाइन अर्ज भरताना काही अडथळे आले का? अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी आहे, याबाबत श्री. सहारिया यांनी करवीर तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात माहिती घेतली.

Web Title: State Election Commissioner J. S. sahariya