राज्याचा दूध पुरवठा रोखणार; राजू शेट्टींचा इशारा

तात्या लांडगे
रविवार, 15 जुलै 2018

तालुकास्तरावर पोलिसांच्या बैठका पार पडल्याची माहिती सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सोलापूर : सरकारसमेवत वारंवार चर्चा करुनही शेतकऱ्यांचे बहुतांशी प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या (सोमवारपासून) राज्यव्यापी दूध बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासगी व सहकारी दूध संघांकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकास्तरावर पोलिसांच्या बैठका पार पडल्याची माहिती सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

राज्यातील शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी मिळालेली नाही. अवकाळी पावसामुळे अथवा गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळाली नाही. बहुतांशी शेतकऱ्यांना तूर-हरभऱ्याच्या हमीभावाची व अनुदानाची रक्‍कम अद्यापही मिळालेली नाही. दूधासह शेतमालाचे दर उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले आहेत. तरीही सरकारचे त्याकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लागल्याशिवाय आता आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. त्यानंतर दूध संघांची मोठी पंचाईत झाली असून सरकारलाही आंदोलनाची चिंता लागली असल्याची चर्चा आहे. 

राजू शेट्टी म्हणाले... 
- मुंबईसह राज्यभरात आंदोलनाचे परिणाम दिसतील 
- शेतकऱ्यांनी संप केल्यानंतर काय होते, याची जाणीव सरकारला होईल 
- पोलिस बंदोबस्त गृहीत धरुनच आंदोलनाची रणनिती 
- दडपाशाहीमुळे शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होईल 
- दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान तर मग शेतकऱ्यांना का नाही 
- सरकारने दरवाढीचा घेतलेला निर्णय दूध संघांनी पाळलाच नाही 

संपूर्ण गावगाडा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाभोवती फिरतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला, दूधाला रास्त भाव मिळाला तरच त्यांचे प्रश्‍न सुटणार आहेत. शेतकऱ्यांनी घातलेले दूध स्वीकारणे दूध संघाचे कामच आहे. परंतु, दूधाच्या दराचा प्रश्‍न सरकारने तत्काळ निकाली काढण्याची गरज आहे. 
- सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर दूध संघ

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State milk agitation starting from today