राज्याने "नगरी पॅटर्न' स्वीकारला..! 

State politics accepted "nagar pattern" ..!
State politics accepted "nagar pattern" ..!

नगर : पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळेच भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. उपमहापौरपदाची संधीही भाजपलाच मिळाली. भाजपच्या मालन ढोणे उपमहापौर झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भाजपशी मैत्री केली. हाच कित्ता आता राज्याच्या राजकारणाने देखील स्वीकारला असल्याची प्रतिक्रीया नगरमध्ये भल्या सकाळपासून उमटत आहेत. 

नगर महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. महापौरपदाच्या सत्ता वाटपावरुन शिवसेना व भाजपमधील हे संबंध ताणले गेले. ते इतके ताणले गेले की कधी तुटले, याची भणकही नेत्यांना लागली नाही. त्यात अचानकपणे सभागृहात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठबळ दिले. सत्तेत कोणतेही पद घेतले नाही. मात्र, शिवसेनेची जिरविण्यासाठी राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली. 

त्या वेळी पक्षश्रेष्ठींनी भाजपला साथ करू नये, अशी ताकीद दिली होती. मात्र, श्रेष्ठींचा आदेश डावलून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका पार पाडली. त्यानंतर पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष माणिक विधाते व पक्षाच्या 18 नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हकालपट्टी केली. अर्थात ही फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच टिकली. त्यानंतर सर्वांवरील कारवाई मागे घेत पक्षाचे पदच्चुत शहर-जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यासह नगरसेवकांनाही पावन करुन घेतले. 

आता हाच कित्ता राज्याच्या राजकारणात गिरवला जात असल्याने नगरमध्ये भल्या सकाळपासून हीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही वेगळ्या विषयाचा पॅटर्न तयार करण्याची नगरकरांची खासियत आहे. ती खासियत आता सर्वमान्य झाली असल्याची चर्चा होत आहे. 

राष्ट्रवादीचे नगरमध्ये सहा आमदार 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगर जिल्ह्यात सहा आमदार आहेत. त्यात संग्राम जगताप (नगर), रोहित पवार (कर्जत-जामखेड), डॉ. किरण लहामटे (अकोले), आशुतोष काळे (कोपरगाव), प्राजक्त तनपुरे (राहुरी) व नीलेश लंके (पारनेर) यांचा त्यात समावेश आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनाही राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते. तथापि, ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत. 

राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजपचा झेंडा...! 
राज्यभर गाजावाजा झालेल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळविलेल्या भाजपला 18 जागांचा धनी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाची व श्रेष्ठींची ध्येयधोरणे बासनात गुंडाळून महापौरपदासाठी पाठिंबा दिला. चार जागांचे बळ असलेल्या बसपच्या हत्तीचीही त्यांना साथ मिळाली. त्यामुळे तब्बल 24 जागा मिळवीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेची एक नगरसेविका गैरहजर राहून भाजपच्या तंबूत गेली. परिणामी, एक आगळेवेगळे "एकीकरण' होऊन भाजपने कमी जागा मिळूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठबळावर महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे लीलया पटकावली आणि महापालिकेत भाजपचा झेंडा लावला. 

वाटलं नव्हत एवढ्या सकाळी याल..! 
विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून केलेल्या "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', या वाक्‍याची मोठीच खिल्ली उडविली होती. मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापन होण्याची चिन्हे धूसर होत गेल्याने फडणवीस यांच्या याच वाक्‍याची पुन्हा पुन्हा खिल्ली उडविली गेली. मात्र, आज फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची भल्या सकाळी शपथ घेतल्याने तेच वाक्‍य पुन्हा ट्रोल झाले. त्यात "वाटल नव्हतं एवढ्या सकाळी सकाळी येईल' असे वाक्‍य ट्रोल होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com