आपली माती, आपली माणसं, आपली अस्मिता...! 

आपली माती, आपली माणसं, आपली अस्मिता...! 

कोल्हापूर - कलापूर कोल्हापूरच्या कला परंपरेला शतकोत्तर हिरकमहोत्सवी परंपरा आहे आणि या कला परंपरेत अनेक शिल्पकार घडले. त्यांनी साकारलेली विविध शिल्पं आणि पुतळे ही कोल्हापूरची अस्मिताच. प्रत्येक पुतळ्यामागे प्रेरणादायी इतिहास आहे आणि प्रत्येक पुतळ्याची वैशिष्ट्ये नव्या पिढीतील कलाकारांसाठी एक कार्यशाळाच आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काही निवडक पुतळे वगळता शहराची ही प्रेरणास्थानं दुरवस्थेकडे चालली आहेत आणि ही दुरवस्था म्हणजे पुतळ्यांची विटंबनाच ठरते आहे. "चला, जपू या मातीचा वारसा' या मोहिमेच्या निमित्ताने आता याबाबत प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांवर भर देता येणार आहे. 

कोल्हापूर शहरात प्रवेश करताना ज्या करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणींना आपण पहिले नमन करतो, त्याचे किमयागार रवींद्र मेस्त्री. या पुतळ्याच्या निर्मितीचाही एक वेगळा इतिहास आहे. पुतळा साकारताना मॉडेल म्हणून रवींद्र मेस्त्री यांच्यासमोर तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्रींसह अनेक नावे होती; पण त्या नावांवर त्यांचे शिक्कामोर्तब होतच नव्हते. कारण त्यांना या पुतळ्यासाठी एका क्षणात ताराराणींची आठवण व्हावी, असेच मॉडेलच हवे होते. शिवाजी उद्यमनगरात काही कामानिमित्त ते गेले असता स्क्रॅप गोळा करण्यासाठी आलेल्या यादवनगरातील धरमाबाई शिंदे त्यांना दिसल्या आणि कैक दिवस शोधत असलेले मॉडेल त्यांना मिळाले. ताराराणींचा पुतळा म्हटल्यावर धरमाबाईंनीही क्षणार्धात संमती दिली आणि पुढे एक भव्यदिव्य पुतळा आकाराला आला. रणरागिणी ताराराणींना मानाचा मुजरा करताना त्या पुतळ्यामागे तमाम कष्टकरी महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धरमाबाई शिंदे यांचेही योगदान आहे आणि या इतिहासालाही या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळणार आहे. 

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे ब्रिटिश राजवटीत केवळ लोकभावनेच्या ताकदीवर उभारलेला पहिला पुतळा. शहरातील काही ब्रिटिशांचे जे पुतळे होते, ते पारतंत्र्याचे प्रतीक असल्याचे मानून स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग म्हणून पाडले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज जिथे उभा आहे, तेथे ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली विल्सनचा पुतळा होता. तो पाडून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा त्यासाठी पुढाकार होता आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी केवळ अठरा दिवसांत हा पुतळा साकारला. गांधी मैदानातील बाबूराव पेंटर यांनीच केलेला महात्मा गांधी यांचा भव्य पुतळाही शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शहाजी महाराजांनी पुतळ्यास पंचवीस हजार रुपये देणगी दिली होती. 1959 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीत देशात त्यांचा उभारलेला हा पहिला पुतळा. भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने 9 डिसेंबर 1949 ला हा पुतळा उभारण्यात आला आणि तो बाळ चव्हाण यांनी साकारला. कोल्हापूर आर्टिस्ट गिल्डच्या पुढाकाराने कलातपस्वी आबालाल रेहमान यांच्या पुतळ्याच्या रूपाने देशात पहिल्यांदा एका चित्रकाराचा पुतळा उभारण्यात आला. आर्टिस्ट गिल्डनेच पुढे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा पुतळा उभारला. आजही हे पुतळे पद्माराजे उद्यानात कोल्हापूरच्या कलापरंपरेची साक्ष देतात. शहरातील ऐंशीहून अधिक पुतळ्यांपैकी ही काही प्रातिनिधिक उदाहरणं; मात्र ही प्रेरणास्थानं जपणं ही प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी आहे आणि म्हणूनच "चला, जपू या मातीचा वारसा' ही मोहीम राबवली जाणार आहे. 

आपले काय चुकते ? 
प्रत्येक पुतळ्याप्रती सर्वांनाच जरूर आस्था आहे; मात्र पुतळा स्वच्छ करणे आणि त्याला मूळ स्वरूपात आणण्याची ऑक्‍सिडायझेशन नावाची एक शास्त्रीय प्रक्रिया असते; मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहता आपण थेट पुतळे पाण्याने धुतो आणि त्यावर काळा ऑईलपेंट देऊन टाकतो. त्यामुळे पुतळा चकचकीत दिसत असला तरी अशा रंगांच्या थरांनी त्याचे मूळ रूपच विद्रूप होऊन जाते. आठ-दहा वर्षांपूर्वी महापालिकेने काही पुतळे अशा शास्त्रीय प्रक्रियेने स्वच्छ केले; पण शहरातील सर्वच पुतळ्यांबाबत या गोष्टीचा विचार होणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com