विट्यातील सहा पोलिसांचा तपास करण्याच्या आदेशाला स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सांगली - संशयितास मारहाणप्रकरणी विटा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे आणि पाच पोलिसांचा तपास करण्याच्या आदेशाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी स्थगिती दिली. पोलिसांच्या वतीने ऍड. प्रमोद सुतार यांनी युक्तिवाद केला. 

सांगली - संशयितास मारहाणप्रकरणी विटा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे आणि पाच पोलिसांचा तपास करण्याच्या आदेशाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी स्थगिती दिली. पोलिसांच्या वतीने ऍड. प्रमोद सुतार यांनी युक्तिवाद केला. 

अधिक माहिती अशी, चोरीतील सोने विकल्याच्या संशयावरून सिद्धार्थ पांडुरंग सोरटे (रा. पलूस) याला पलूस येथून 6 डिसेंबर 2016 ला बोलवून विटा पोलिस ठाण्यात आणून काठीने व बेल्टने मारहाण केली म्हणून त्याने विटा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर फिर्याद दिली होती. फिर्यादीमध्ये विट्यातील सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, हवालदार प्रशांत चव्हाण, विलास मुंडे, सुनील पाटील, दीपक यादव, चेतन सानप यांच्यावर मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप सोरटे याने केला होता. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विटा न्यायालयात सुनावणी होऊन भारतीय फौजदारी दंड संहिता कलम 156 (3) प्रमाणे सहा पोलिसांविरुद्ध तपास करण्याचा आदेश विटा पोलिस ठाण्यात दिला. त्यानुसार नुकतेच विट्यातील उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांनी सहा जणांची चौकशी केली. 

विटा न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सहा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात ऍड. सुतार यांच्या वतीने रिव्हिजन अर्ज दाखल केला. ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कक्षेत येत नाही. तसेच शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे ऍड. सुतार यांनी न्यायाधीश श्री. रामटेके यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायाधीश श्री. रामटेके यांनी सहायक निरीक्षक घोंगडे आणि पाच पोलिसांचा तपास करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. तसेच पुढील सुनावणीसाठी तारीख दिली आहे.

Web Title: A stay order to the police to investigate