सासूच्या बांधकामासाठी चोरले स्टील; चौघांना कोठडी

सासूच्या बांधकामासाठी चोरले स्टील; चौघांना कोठडी

सोलापूर : कारंबा परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि 18 हजार 900 रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या (स्टील) असा एकूण एक लाख 68 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेले स्टील या गुन्ह्यातील म्होरक्‍या रामा काळे याच्या सासूच्या घरच्या बांधकामासाठी नेल्याचे चौकशीतून समोर आले आहे. 

1 फेब्रुवारी 2019 रोजी दत्तात्रय अण्णप्पा बहिर्जे (वय 58, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) हे त्यांचे नवीन घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी झोपले होते. पहाटे दीडच्या सुमारास 20 ते 30 वयोगटातील अज्ञात चोरट्यांनी त्यांना काठीने मारून, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन 38 हजार 825 हजार रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने टेम्पो वाहनचालक भीमाशंकर हणमंतू ठणकेदार (वय 37, रा. मड्डीवस्ती, जुना तुळजापूर नाका, सोलापूर) यास 19 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले होते. त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली होती. त्याच्या साथीदारांची चौकशी करण्यात आली. रामा ऊर्फ रामचंद्र चंदू काळे (वय 30, रा. नरोटेवाडी, ता. उत्तर सोलापूर), किरण शिवाजी काळे (वय 25), सुखदेव शिवाजी काळे (वय 28, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांची नावे समोर आली. 

ठणकेदारच्या साथीदारांना शोधून काढले. सर्व आरोपींकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 18 हजार 900 हजार रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या, एक लाख 50 हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन व वासा असा एकूण एक लाख 68 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे तपास करीत आहेत. 

ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलिस हवालदार महमंद इसाक मुजावर, नारायण गोलेकर, गोरक्षनाथ गांगुर्डे, राजशेखर निंबाळे, मोहन मनसावाले, पोलिस शिपाई पांडुरंग केंद्रे, अक्षय दळवी, अमोल जाधव व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याकडील पोलिस शिपाई महादेव सोलनकर यांनी बजावली आहे. 

या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण काळे याच्यावर यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा म्होरक्‍या रामा काळे याच्या सासूचे होटगी येथे घर आहे. सासूने घराच्या बांधकामासाठी स्टील विकत आणण्यासाठी पैसे दिले होते. रामा व त्याच्या साथीदारांनी कारंबा येथून स्टील चोरून होटगीला नेऊन टाकल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com