'माण'मध्ये फिरु लागले गुलालाचे ट्रक?

sticker of gulal truck virals on social media
sticker of gulal truck virals on social media

मायणी : जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि काल रात्रीपासुन थेट गुलालाचे ट्रकच माण मतदार संघात फिरु लागले. कुणीही काहीही करु देत. गुलाल आपलाच आहे. अशी साखरपेरणी कार्यकर्त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गुलालाने भरलेल्या ट्रकांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकींच्या जाहीर प्रचाराची सांगता काल झाली. आरोप प्रत्यारोपांनी राजकीय आखाडे, मैदाने दणाणून गेली. अनेक नेत्यांच्या वक्तव्यांतुन 'आपला तो बाब्या अन् दुसर्‍याचं ते कार्ट' याबरोबरच 'खोट बोल पण रेटुन बोल' म्हणींचा प्रचारा दरम्यान प्रत्यय आला. जाहीर प्रचार संपताच आता गनिमी काव्याने प्रचार सुरु करण्यात आला आहे. मतदार संघातील वेगवेगळ्या गावांचा सुक्ष्म अभ्यास झाल्याने कुठे काय करावे लागेल याचे आडाखे मांडले जात आहेत. कोणत्या पॉकेटमध्ये आपणास आघाडीं मिळेल आणि कुठे आपण कमी पडु. कितीने वाढु आणि कितीने कमी पडु. याबाबत आकडेवारी मांडली जात आहे. त्यानुसार विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. साम दाम दंड भेद अशा सर्व नीतींचा पुर्ण क्षमतेने वापर करुन गुलाल मिळविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत खिंड लढविण्याचे नेटके नियोजन करण्यात येत आहे. त्याचदरम्यान विरोधकांच्या हालचालींवरही बारकाईने नजर ठेवली जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, भुरळ पाडण्यासाठी विरोधक कोणत्या खेळी खेळणार आहेत. त्यावर प्रत्येक स्पर्धक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. दरम्यान, होणार्‍या एकूण मतदानाची टक्केवारी, त्यामध्ये विभागणी होऊन आपणास मिळणारी मते यांची गोळाबेरीज मांडत आहेत. मग गुलाल आपलाच असल्याचे सांगुन अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांना दिलासा देत आहेत. तर गोळाबेरीज जुळत नसतानाही काहीजण गुलाल आपलाच असल्याचे 

मुद्दाम पेरत गोबेल नीतीने राजकीय वातावरण  बदलवण्याचा आटापिटा करीत आहेत. त्यातुनच आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांचे, गटांचे कार्यकर्ते गुलालाचे ट्रक सोशल मिडियावर फिरवु लागले आहेत. कालचे वातावरण आज नाही. नेते एकीकडे व जनता दुसरीकडे आहे. लोकांनीच निवडणूक हातात घेतली आहे. काय जादु होतेय बघा तरी नुसतं. अशा  विजयाचे चित्र निर्माण करणार्‍या मजकुरांसह गुलालाने भरलेल्या ट्रकचे स्टिकरचा वर्षाव धडाधड विविध ग्रुपवर होऊ लागला आहे. त्यामुळे मतदानाआधीच लोकांना मतमोजणीच्या दिवसाची आस लागली आहे. त्याचबरोबर जागते रहो. रात्र वैर्‍याची आहे. बेफिकिरी नको. हालचालीवर ठेवा. आपणाकडून काही कमी पडता कामा नये. असे आवाहन करीत उमेदवारांनी गावोगावच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com