पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेने 'या' केल्यात उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी "सकाळ' ने सातत्याने आवाज उठविला आहे. त्या संदर्भात विविध उपक्रमही राबविले आहेत. प्रदूषणाची दाहकता मांडण्यापासून त्यावरील उपायांबाबतची मांडणी "सकाळ' सातत्याने केली आहे. 

कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. दोनच दिवसांत बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम होणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्याचा दावा आज महापालिकेने पत्रकाद्वारे केला आहे. 

महापालिकेतर्फे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत जयंती नाला, लाईनबझार नाला व बापट कॅम्प नाला अडवणे व वळविणे ही कामे प्रस्तावित केली होती. या पैकी जयंती नाला मे 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवून कार्यान्वित केला होता.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 
 

ही कामे पूर्ण

या कामातील उर्वरित नाल्यांपैकी सीपीआर नाला व जुना बुधवार नाला जून 2019 मध्ये महापालिकेने अडवून वळविला आहे, तर 5.5 एमएलडीचा लाईनबझार नाला 27 नोव्हेंबरला पूर्ण क्षमतेने अडवून 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविला आहे. बापट कॅम्प नाला 11.5 एमएलडी अडवून वळविण्यासाठी आवश्‍यक कामापैकी दाबनलिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उर्वरित पाईप जोडणे व पंपिंग मशिनरी उभारणी करणे, ही कामे पूर्ण झाली आहेत. 

76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणार

बापट कॅम्प नाला पूर्ण क्षमतेने अडवून दोन ते तीन दिवसांत 76 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. त्यासाठी आज जयंती नाला उपसा केंद्राचा दोन ते तीन तासाचा शटडाऊन घेतला होता. नाले अडवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड व जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

"सकाळ' चे पाठबळ 

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी "सकाळ' ने सातत्याने आवाज उठविला आहे. त्या संदर्भात विविध उपक्रमही राबविले आहेत. प्रदूषणाची दाहकता मांडण्यापासून त्यावरील उपायांबाबतची मांडणी "सकाळ' सातत्याने केली आहे. 

96 टक्के प्रदूषणमुक्त होणार 

उर्वरित वीटभट्टी नाला, लक्षतीर्थ नाला, राजहंस नाला, ड्रीमवर्ल्ड नाला व कसबा बावडा आदी 5.61 एमएलडीचे छोटे नाले अडविणे व वळविण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बापट कॅम्प येथील नाला दोन दिवसात कार्यान्वित झाल्यास 96 टक्के पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार आहे. 

नाले जोडणार सांडपाणी प्रकल्पास
पंचंगगा नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेने खूप चांगले काम केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कसबा बावडा आणि दुधाळी या दोन ठिकाणी आहे. त्याचबरोबर या सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नाले वळविण्याचे काम सुरु होते. आता बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम सुरु असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्गत याबाबतीतही ठोस उपाययोजना करत आहोत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यातले हे महत्वाचे पाउल आहे. 
- डॉ. एम. एस. कलशेट्टी, आयुक्त, महापालिका  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To Stop Panchagaga Pollution Corporation Remedy plan