उन्हाळ्यासाठी आताच साठवून ठेवा "ही' ऊर्जा

उन्हाळ्यासाठी आताच साठवून ठेवा "ही' ऊर्जा

सोलापूर : दिवाळीपासून थंडी जाणवण्यास सुरवात होते. हिवाळा हा ऋतू शरीराला सुदृढ व बळकटी देणारा आहे. या ऋतूमध्ये शरीराची अग्नी वाढते. थोडे काम करूनही जास्त भूक लागते. याउलट उन्हाळ्यात अग्नी मंद होते. म्हणून हिवाळ्यात चांगला व पोषक आहार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून हिवाळ्यात निर्माण झालेली ऊर्जा येणाऱ्या उन्हाळाभर शरीरात साठून राहू शकेल, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

आपण दिवाळीपासून तळलेले पदार्थ, तुपाचे पदार्थ व सुका मेव्याचे पदार्थ खायला सुरवात करतो. पचण्यास जड व पोषक पदार्थांचे सेवन साधारण संक्रांती किंवा रथसप्तमीपर्यंत करत असतो. या पदार्थांमुळे शरीराला लागणारी ऊर्जा तर मिळतेच, त्याचप्रमाणे शरीरात झालेली पोषक द्रव्यांची कमतरता भरून निघते. त्यासाठी शरीराला पोषक असे डिंकाचे, तिळाचे, नाचणीचे व सुका मेव्याचे लाडू खावेत. या पदार्थांमध्ये साखर न वापरता गूळ, खरकेची पूड किंवा खजूर वापरावे. यामुळे शरीराला चांगल्या प्रकारे लोहपुरवठा होईल. पावसाळ्यात फळभाज्या जास्त व पालेभाज्या कमी खाल्ल्या जातात. त्यामुळे शरीराला झिंक व सेलेनियमची कमतरता भासते. हे भरून काढण्यासाठी हिवाळ्यात पालेभाज्या जास्त खाव्यात.

हिवाळ्यात घ्या असा आहार
■ कॅल्शिअम, फॉस्फरस व मॅग्नेशिअमसाठी दूध, तूप, लोणी, चिकन, मटण, मासे, अंडी या पदार्थांचा आहारात समावेश असावा. किमान दोन फळे रोज खावीत.
■ शीतपेये न पिता हॉट सूप्स, गवती चहा, आलं घालून गरम चहा, गरम लेमन टी, ग्रीन टी प्यावे.
■ हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणे ठेवावे. कारण, थंडीमुळे त्वचा शुष्क होऊन खाज सुटते व जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. म्हणून त्वचेला हायड्रेट ठेवणे व त्वचेचे गारव्यापासून रक्षण करणे गरजेचे आहे.
■ जास्त भूक लागल्यामुळे जास्त खाल्ल्याने वजन वाढते. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.
■ भाज्या, फळे, गरम सूप यावर जास्त भर द्यावा. नियमित व्यायाम करावा. गोड पदार्थ टाळावेत.
■ आहारात गाजर, बीट, विविध प्रकारच्या शेंगभाज्या व मटार यांचा समावेश करावा. यामुळे शरीराला अनेक प्रकारची पोषक द्रव्ये मिळतात.
■ तीळ, काळे तीळ, जवस यांचा चटणीच्या स्वरूपात किंवा लाडूच्या स्वरूपात वापर करावा. मुळात हे पदार्थ उष्ण असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

शरीरप्रकृतीनुसार ठेवा आहारावर नियंत्रण
शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी ज्या-त्या ऋतूंनुसार आपला आहार असावा. हिवाळ्यात पचनक्रिया सुधारते. थकवा कमी जाणवतो. शरीराची चयापचय क्रिया वाढते. भूक जास्त लागत असल्याने जास्त आहार घेतला जातो; मात्र ज्यांच्या-त्यांच्या शरीर प्रकृतीनुसार आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- अश्‍विनी अंधारे, आहारतज्ज्ञ, सोलापूर
महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com