वादळी पाऊस द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर 

वादळी पाऊस द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर 

विटा - खानापूर तालुक्यातील द्राक्ष पट्टयात काल रात्री पडलेल्या वादळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. पन्नास टक्के द्राक्षबांगा या फुलोरावस्था ते मणीसेटींग या दरम्यान असल्याने हा पाऊस द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठला आहे. पावसाच्या उघडीपीनंतर द्राक्षावर फवारणी करण्याची द्राक्ष उत्पादकांची धांदल सुरु असल्याचे चित्र द्राक्ष पट्टयात पहावयास मिळत आहे. 

अगोदरच पाण्याचे दुर्भिक्ष त्यात वादळी पावसाचा फटका बसत असल्याने फुलो-यात आलेल्या बागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काल (ता. १८) रात्री अकरा वाजल्यापासून पावसाने सुरवात केली. खानापूर घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली.

हिवरे, पळशी, पोसेवाडी, धोंडेवाडी, बलवडी (खा), खानापूर, बेणापूर, लेंगरे, देविखिंडी यासह परिसरात निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात तयार केली जातात. पावसामुळे द्राक्षघडात पाणी साचते. त्यामुळे फळांची कुज होते. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे.

कालपासून पाऊस व ढगाळ वातावरण आहे. केंव्हाही पाऊस पडेल अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासादायक आहे. परंतु द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे. त्यामुळे नुकसान होऊन आर्थिक फटका बसणार असल्याचे द्राक्ष उत्पादक सांगत आहेत. 

माझी सहा एकर द्राक्षबाग आहे. नऊ अॉक्टोंबरला फळ छाटणी घेतली होती. काल पडलेल्या पावसामुळे दोन एकर द्राक्ष बागेवर या पावसाचा परिणाम झाला आहे. फळकुज होऊ नये, यासाठी महागडी फवारणी द्राक्षबागेवर सुरु केली आहे. असेच वातावरण राहिले तर मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 
- विठ्ठल जाधव, 
द्राक्ष उत्पादक, पोसेवाडी, (ता.खानापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com