ओ सर...भीक मागत नाही, काम मागतोय..! 

परशुराम कोकणे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

ऋषिकेश काळे असे हा मुलगा त्याच्यापेक्षा तीन वर्षांने मोठी असलेल्या त्याच्या बहिणीसोबत सोलापुरात राहतो. नववीत शिकणाऱ्या ऋषिकेशने आठवीमध्ये 68 टक्के गुण मिळाल्याचे सांगितले. ऋषिकेश दिवसभर बूट पॉलिश करून रात्री शाळेला जातो. 

सोलापूर : कामाच्या धावपळीत असताना ऍड. मंजूनाथ कक्कळमेली यांच्यासोबत गेल्या आठवड्यात एक छोटासा किस्सा घडला. 10 ते 12 वर्षांच्या बूट पॉलिश करणाऱ्या मुलाने "ओ सर...भीक मागत नाही, काम मागतोय..!' असे म्हणून काळ्या कोटात असलेल्या माणसाला जागं केलं आणि विचार करायला भाग पाडलं.
 

Image may contain: 2 people, eyeglasses, selfie, outdoor and closeup
ऍड. मंजूनाथ कक्कळमेली यांनी बूट पॉलिश करणाऱ्या ऋषिकेश काळेसोबत काढलेला सेल्फी. 

हेही वाचा : `या` पैलवानाने पटकावले 75 हजाराचे पारितोषिक

सर, मला तुमचे शूज द्या ना..
जिल्हा न्यायालयाच्या आवारात ही घटना घडली. ऍड. मंजूनाथ हे नोटरीच्या कामासाठी गडबडीत निघाले होते. एक मुलगा त्यांच्या शेजारी आला. मुलाच्या हातात कापडी पिशवी, डोक्‍यावर टोपी, अंगावर मळकटलेला हाफ शर्ट होता. "ओ सर, तुमचे शूज द्या ना... मी पॉलिश करून देतो...' असे तो म्हणाला. गडबडीत असल्याने त्यांनी मुलाला बूट पॉलिश करण्यास नकार दिला. तरी सुद्धा तो मुलगा त्यांच्या मागे लागला होता. "सर, मला तुमचे शूज द्या ना, पॉलिश करायचे आहे. बूट पॉलिश करून देतो... मी भीक मागत नाही, काम मागतोय..!' हे वाक्‍य कानी पडल्यावर ऍड. मंजूनाथ जागेवर थांबले.

हेही वाचा : काय आहे रेडी कोन, ज्यामुळे होताहेत कामगार बेरोजगार

आठवीमध्ये 68 टक्के गुण
ऍड. मंजूनाथ यांनी त्या मुलाकडे वळून बघितलं आणि त्याला काही न बोलता शूज काढून पॉलिश करण्यासाठी दिले. सहज चौकशी करावी, या भावनेने त्यांनी त्या मुलाशी संवाद साधला. ऋषिकेश काळे असे त्याने नाव सांगितले. त्याचे आई-वडील मुंबईत राहतात, असे तो म्हणाला. त्याच्यापेक्षा तीन वर्षांने मोठी असलेल्या त्याच्या बहिणीसोबत तो सोलापुरात राहतो. नववीत शिकणाऱ्या ऋषिकेशने आठवीमध्ये 68 टक्के गुण मिळाल्याचे सांगितले. ऋषिकेश दिवसभर बूट पॉलिश करून रात्री शाळेला जातो. 

शिक्षण घेण्याची तळमळ
बूट पॉलिश करून झाल्यावर ऍड. मंजूनाथ यांनी ऋषिकेशला पैसे दिले. "सर, मला साहेब व्हायचे आहे...तुमच्यासारखे...' असे तो म्हणाला. त्याच्यातली गुणवत्ता आणि त्याच्यातली शिक्षण घेण्याची तळमळ पाहून ऍड. मंजूनाथ यांना विचार करायला भाग पाडलं. ऍड. मंजूनाथ यांनी लागलीच जवळच्या दुकानात त्या मुलाला नेले आणि एक पेन घेऊन दिला. पुन्हा भेटू म्हणून त्याचा निरोप घेतला. 

बूट पॉलिश करणाऱ्या ऋषिकेशने मला परिस्थितीला सामोरे जात जगण्याची व शिकण्याची जिद्द शिकवली आहे. आपलं पोट भरण्यासाठी, घर चालवण्यासाठी तो या वयात कष्ट करतोय. सार्वजनिक ठिकाणी कष्ट करणाऱ्या मुलांना आपण सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. जर कोणी भीक मागत असेल तर त्याला भीक देऊ नये. काम करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करावे. 
- मंजूनाथ कक्कळमेली, 
विधिज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of children who polish shoes