मोडून पडला संसार... पण मोडला नाही कणा 

सुस्मिता वडतिले
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  • चाटी गल्लीत हातगाडी ओढणाऱ्या महिलेचा जीवन संघर्ष 
  • घरातील खर्चही मोठा, नवऱ्याच्या दवापाण्याचा खर्च तो वेगळाच
  • 21व्या वर्षापासून काम
  • हातगाडी ओढायचे काम 

सोलापूर : आयुष्याचा जोडीदार आजारपणातून अंथरुणावर खिळला. पदरात सात मुली अन्‌ दोन मुले. त्यात नवऱ्याची कमाई बंद झाली. संसाराचा प्रपंच भागवायचा कसा, हा प्रश्‍न निर्माण झाला. घरातील खर्चही मोठा, नवऱ्याच्या दवापाण्याचा खर्च तो वेगळाच! घर चालावयाचे कसे, याच्या चिंतेने झोपही उडाली. नवऱ्याने अंथरुण धरल्याने संसारच मोडून पडला. पण अशातही कोंडाबाई शिंगे यांनी हिम्मत सोडली नाही. 

हेही वाचा : विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीसच 
21व्या वर्षापासून काम 

चाटी गल्ली परिसरात वावर असलेल्या कोंडाबाई शिंगे वयाची 68 वर्षे पार करतच आजही संसाराचा गाडा ओढत आहेत. या हातगाडा ओढणाऱ्या जिद्दी अन प्रामाणिक महिलेच्या संघर्षाची ही जीवनगाथा. 21 व्या वर्षापासून त्या अगदी पुरुषांप्रमाणेच आजही हातगाडी ओढत आहेत. वास्तविक गाडी ओढणे हे तसे पुरुषांचे आणि कष्टाचे काम. कोंडाबाईनी आलेल्या परिस्थितीशी टक्कर देताना पाठीचा कणा मोडू दिला नाही. हातगाडी ओढून संसाराच्या दोन्ही चाकांची जबाबदारी पेलली, अन्‌ संसार सावरला. मुले लहानाची मोठी केली. या कामातूनच त्यांनी मुलामुलींची लग्नाची जबाबदारी पार पाडली. हातगाडी ओढून हमाली करून सात मुली आणि दोन मुलांचा सांभाळ केला. जगण्याचा संघर्ष अजून पाठ सोडायला तयार नाही. आजही आयुष्याच्या होरपळीत कोणाच्या नावाने बोटे मोडत न बसता प्रचंड कष्ट उपसून संसाराची हिरवळ फुलवत आहे. संपूर्ण आयुष्य हातगाडी ओढण्यात गेले. पण या हातगाडीनेच संसाराला साथ दिली. 

 

हेही वाचा : बापरे! उजनी जलाशयात मगर (व्हिडीओ) 
हातगाडी ओढायचे काम
 
आयुष्यभर संघर्ष नशिबी आलेल्या कोंडाबाईचा एक मुलगा हयात नसून दुसरा सांभाळत नाही. म्हणतात ना संसाराची गाडी चालवायला दोन चाके लागतात. त्या गाडीला एक चाक नसेल तर गाडी चालत नाही, पण आज तिचा पती असूनही आजारी असल्याकारणाने अंथरुणावर आहे. पण कोंडाबाई न डगमगता या परिस्थितीला सामोरे जात आहे. तिच्या या जिद्दीला सलाम. कोंडाबाईंच्या रोजच्या कामाची वेळ सकाळी 10 ते रात्री नऊ-10 वाजेपर्यंत सुरू असते. पूर्वी 25 पैसे देऊन हातगाडी भाड्याने घेत होत्या. आता दोन वर्षे झाली स्वत:ची हातगाडी आहे. हातगाडीवरील दोन-तीन गठ्ठ्यांचे वजन 50 ते 60 किलो असते. इतके वजन ओढायचे काम त्या करत आहेत. रोज कमीतकमी 100-150 रुपयांची कमाई होते. रोज मिळेल त्याच कमाईतूनच संसार चालवत आहे. या वयात ओझे पेलणे शक्‍य नाही, पण परिस्थितीमुळे संसाराचा गाडा चालवण्यासाठी याला समोरे जावेच लागते. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते, त्यातीलच एक उदाहरण म्हणजे कोंडाबाई शिंगे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of a grandmother who pulled a hand cart