गोष्ट पारुबाईची; करेवाडीच्या माणुसकीची !

E
E

सांगली : ज्येष्ठांच्या हेळसांडीच्या कहाण्या कानावर पडत असताना जत तालुक्‍यातील करेवाडीच्या पारुबाई सिध्दाप्पा हेगडे ( वय 73) यांची मात्र गावाने अखेरपर्यंत सेवा केली. या परिसरात सेवाभावी काम करणाऱ्या येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीने तिचं पालकत्व घेतलं. अन्न-पाणी, घर,दवाखाना असं सारं काही केलं. कालच्या मंगळवारी पारुबाईचं निधन झालं. सर्वांनी एकत्र येत अंत्यसंस्कार केले. मात्र माणुसकीच्या घट्ट धागा आजही कायम आहे.

जत तालुक्‍यात अकाली वैधव्य आलेल्या, परित्यक्‍त्या स्त्रियांचे नाना प्रश्‍न. त्यांच्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी येरळा हरतऱ्हेने मदतीचा हात देत असते. आठ दहा वर्षापुर्वीच्या टोकाच्या दुष्काळात सांगलीतील लुल्ला चॅरीटेबल ट्रस्ट, दैनिक सकाळ आणि येरळाने संयुक्तरित्या पाषाण पालवी उपक्रमातून जत तालुक्‍यातील अशा सुमारे आठ नऊशे महिलांना सहा महिने तातडीच्या शिधा वाटपातून मदतीचा हात दिला होता. या उपक्रमातील एक लाभार्थी होत्या पारुबाई. पुढे "येरळा'ने मदतीचा हात पुढे कायम ठेवला. इंदिरा आवास योजनेतून त्यांना घरबांधकामासाठी जागा मिळाली, पैसे मिळाले. ते अपुरे पडले. "येरळा'ने ते घर पुर्ण करून घेतले.
गेल्या काही वर्षापासून प्रकृती खालावली. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. या संपुर्ण काळात येरळाने आणि गावचे सरपंच हिंदुराव शेंडगे यांनी दवाखान्यापासून सारी काही काळजी घेतली. "येरळा'चे कार्यकर्ते राहुल कांबळे यांनी तिची आस्थेने काळजी घेतली. अगदी प्रसंगी दवाखान्यात थांबून शुश्रूषा करण्यापर्यंत सारे केले. अगदी अलीकडे तर शेजाऱ्यांनी तिच्यासाठी घरपोहच डब्याची सोय केली. पारुबाईंनी शेवटपर्यंत घर सोडले नाही. एकट्याच त्या घरी रहायच्या. सर्वांच्या मदतीने छान रहायच्या.
कालच्या मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी त्यांचा दरवाजा उघडा नव्हता. शंकेची पाल चुकचुकली. गावकऱ्यांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. शांत मुद्रेने पारुबाई इहलोकाच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. त्यांच्या अखेरच्या अंत्यसंस्काराला येरळाचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. पारुबाईं गेल्या मागे फक्त छोटे घर. त्यातली जगण्यापुरतीची चार भांडी. आता ग्रामस्थांनी पारुबाईंचं हे घर अशाच कोणा एखाद्या गरजुला द्यायचा निर्णय घेतलाय. त्यातून गावाने माणुसकीची ही ज्योत जपण्याचाच जाणून निर्णय घेतला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com