सुन्न झाली मने अन् बोथट झाल्या संवेदना ; का रे मानवा दुरावलास जिवलगापासून

शामराव गावडे
Tuesday, 1 September 2020

गावापासून लांब असणारा कोरोना संसर्ग गावापर्यंत अगदी घरापर्यंत पोहचला आहे.

नवेखेड : सुन्न झाली मने आणि बोथट झाल्या संवेदना अशीच काहीशी अवस्था कोरोना ग्रस्त भागातील नागरिकांची झाली आहे. कोरोनाचा फैलाव वाढला आहे. अँटीजन टेस्ट, स्वॅब घेणे, लक्षणे दिसल्यानंतर विलगीकरन करणे यामुळे गावगाड्यातील वातावरण बदलले आहे. गावापासून लांब असणारा कोरोना संसर्ग गावापर्यंत अगदी घरापर्यंत पोहचला आहे. सर्वत्र कोरोनाच्या मृत्युने थैमान घातले आहे. दररोज आणखी कोण वाढले आहे का याची चौकशी सतत गावकरी एकमेकांजवळ करत आहेत. 

हेही वाचा -  मूडच नाही...! त्यांना आता वेध खवय्यांचे...

जिवाभावाची नात्यातील गावगाड्याच्या भावकीतील लोक या संसर्गाला बळी पडत आहेत. शासकीय आदेशानुसार बधितांच्या घरापुढे कोरोनाबाधित क्षेत्र असा बोर्ड लावावा लागत आहे. त्यामुळे वातावरण सर्वत्र बदलले आहे. इच्छा असूनही त्या ठिकाणी जाता येत नाही. संबंधित कुटुंबे ही दबावाखाली वावरत आहेत. कोरोनाने बळी घेतला आहे. अशा ठिकाणी जवळच्या लोकांना जाणे अपरिहार्य आहे. ते घरासमोर जाऊन एकमेकांना हातानेच इशारा करीत आहे. डोळ्यांची आणि काळजाची भाषा एकमेकांना समजत आहे. लोकांची मानसिकता बदलत आहे. 

एरव्ही सुखदुःखाच्या कार्यक्रमात जेवण असायचे. सर्वजण त्यासाठी  झटायचे परंतु त्याची आठवणही कोणाला होत नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर दहण करणे रक्षाविसर्जन सुखदुःखात जवळ जाणे. दुःखाच्या माणसाला कौटुंबिक मानसिक आधार  देणे, या मानवी घटनांवर अनपेक्षितरित्या बंधने आली आहेत. मॉर्निंग वॉक अलीकडे बंद झाले आहे. ग्रामीण भागात शेतीकामे वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांना अंतिम दर्शनही मिळणे कठीण झाले आहे. जवळचीच लोक दुःखात सहभागी होत नाहीत. 

हेही वाचा -   विसर्जनानंतरही गणेशाची होते पुनर्प्रतिष्ठापना ; आनोख्या परंपरेच हे गाव...

एरव्ही इतरांच्या  दुःखात  आपल्या डोळ्यात पाणी आणणारी, जीवाला जीव देणारी मंडळी या संसर्गामुळे मात्र दुरावली आहेत. असे काही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कोरोना मोठा होत गेला आणि माणूस लहान होत गेला अशीच अवस्था सध्या मानवी समाजाची झाली आहे. लवकरात लवकर ही महामारी संपावी आणि आमची माणसे आम्हांला भेटावीत अशी भावना गावगाड्यातला प्रत्येक माणूस करीत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the story of village people during corona period people in sangli