महाबळेश्‍वरला होणार स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र

उमेश बांबरे
सोमवार, 2 जुलै 2018

सातारा - फळबाग लागवड योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश आणि मातृरोपांच्या नर्सरींना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढणार असून, लवकरच महाबळेश्‍वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाणार आहे. 

सातारा - फळबाग लागवड योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश आणि मातृरोपांच्या नर्सरींना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढणार असून, लवकरच महाबळेश्‍वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्‍यातील पाचगणीसह इतरत्र, तसेच जावळी व वाई तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. हे या भागातील नगदी पीक असूनही या पिकाचा फळबाग लागवड योजनेत समावेश नव्हता. तसेच या पिकाच्या मातृरोपांपासून रोपांची निर्मिती करणाऱ्या नर्सरी  महाबळेश्‍वर, पाचगणी, जावळी यासोबत कोरेगाव, सातारा, माण तालुक्‍यांत उभारल्या जातात. परंतु, या नर्सरींना कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. कमी पावसाच्या तालुक्‍यातील अनेक शेतकरी अशा स्ट्रॉबेरीच्या मातृरोपांची नर्सरी करून त्याच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवत होते. तर कोरेगाव, सातारा तालुक्‍यांत प्रायोगिक तत्त्वावरही स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. पण, या सर्वांना कोणतेही शासकीय अनुदान मिळू शकत नव्हते. याबाबत साताऱ्यातील रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी व पणन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी स्ट्रॉबेरीचा फळबाग लागवड योजनेत समावेश करावा, स्ट्रॉबेरीच्या मातृरोपांच्या नर्सरीला अनुदान मिळावे, कोरेगाव येथील घेवड्याला अनुदान मिळावे, ग्रीन हाउसमधील लागवड साहित्यास अनुदान मिळावे आदी मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची दखल घेऊन सहपालकमंत्री खोत यांनी महाबळेश्‍वर येथील बैठकीदरम्यान, महाबळेश्‍वरात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या केंद्रासाठी अडीच हजार एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाणार आहे. आजपर्यंत महाबळेश्‍वर परिसरात स्ट्रॉबेरीतून खासगी कंपन्यांनी प्रक्रिया उद्योग राबविले. आता शासकीय पातळीवरून स्ट्रॉबेरीपासून विविध उपपदार्थांची निर्मिती करण्याबाबत संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न होतील. तसेच शासकीय अनुदानाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीवरील प्रक्रिया उद्योग उभे राहतील. तसेच मातृरोपांची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना नर्सरीचे अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन जाती आणि प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शाश्‍वत उत्पन्न मिळणार आहे.

आले, बटाट्यानंतर आता स्टॉबेरी!  
यापूर्वी सातारा जिल्ह्यात आले, बटाटा संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. पण, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. आता यामध्ये स्टॉबेरी संशोधन केंद्राची भर पडली आहे. पण, या केंद्रासाठी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतल्याने आगामी काळात हे केंद्र उभे राहून स्ट्रॉबेरी उत्पादकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: strawberry Research Station to Mahabaleshwar