मोकाट जनावरांचा उच्छाद ; वाहनचालक धोक्‍यात 

मोकाट जनावरांचा उच्छाद ; वाहनचालक धोक्‍यात 

सांगली - मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. सुमारे पन्नासवर प्राण्यांना जीवही गमवावा लागला. मोकाट जनावरांना पकडणे, मालकांचा शोध घेण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतलेली आठवत नाही. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या पथकांवर मात्र हल्ले होत असल्याने कर्मचारीही यापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे. 

दरम्यान, मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्याने पारित केलेल्या कायद्याचीही महापालिकेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्राणिमित्रांनी केली आहे. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आरोग्य विभागाला सूचना देऊनही आरोग्याधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत. 

अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिका आणि नगरसेवकांकडे या संदर्भात तक्रारींचा ओघ वाढला. कारवाई मात्र होताना दिसत नाही. शहरातील महामार्गावरील आणि वेगवेगळ्या वस्त्यांतील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. विश्रामबाग चौकात मोकाट जनावर रस्त्यावर आडवे आल्याने अनेक अपघात झाल्याचे चित्र समोर आहे. स्फूर्ती चौक, बसस्थानक परिसर, कुपवाड रस्ता, आंबा चौक आदी परिसरात अनेकदा जनावरे रस्त्यावर असल्याने वाहतूक खोळंबते. जनावरे रस्त्यात बसत असल्याने अनेकदा अपघात होतात. शहरात दोन वर्षांत झालेल्या अपघातात पन्नासवर जनावरांचा जीव गेला. काही वाहनचालकांनाही गंभीर दुखापत झाली. त्याला जबाबदार कोण ? शहरातील विविध भागात जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यावर उभा किंवा बसलेला असतो. महापालिकेचा कोंडवाडा अस्तित्वात नाही. जनावर मालकांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. आठवडा बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. त्यांचा बंदोबस्त करण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नाही. त्याचे परिणाम पादचारी, वाहनचालकांनाच भोगावे लागत आहेत. 

केंद्र, राज्याचे कायदे 

पशू क्रूरता नियम व अधिनियम 1960, मुंबई पोलिस कायदा 1951, महाराष्ट्र शहरी भागात जनावरांना बाळगणे व त्यांचा संचार नियंत्रित कायदा 1976 असे विविध कायदे आहेत. या अंतर्गत दंडात्मक कारवाई आणि कारावास अशा शिक्षेचीही तरतूद आहे. 

नसबंदीचा फार्स 

महापालिकेतर्फे दरवर्षी भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा फार्स रंगतो. लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यानंतर काही कुत्र्यांची नसबंदी झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्यातील फोलपणा काही दिवसांत दिसून येतो. शहरातील प्रमुख भागात कुत्र्यांचा सुरू असणारा बिनधास्त वावर दिसून येतो. यामुळे नागरिकांचे जीव धोक्‍यात आले आहे. त्यावर प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. 

""शहरात मोकाट जनावारांचा सुळसुळाट आहे. त्यावर नियंत्रणासाठी महापालिकेने कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे. त्याकडे अधिकारी साफ दुर्लक्ष करीत आहेत. शहरात वर्षात पन्नासवर प्राण्यांचे जीव अपघातामुळे गेले आहेत.'' 

- डॉ. नरेश उप्रेदी,  मुख्य कार्यकारी अधिकारी, ऍनिमल राहत, सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com