'आदिवासी महिला हल्ला प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा'

'आदिवासी महिला हल्ला प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा'

श्रीगोंदे (नगर) - तालुक्यातील भानगाव येथील आदिवासी महिलेवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव यांनी केली.

श्रीगोंद्याचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे याबाबत निवेदन दिले. भारिप बहुजन महासंघ, पारधी समाज आराखडा कृती समिती, महिला समस्या निवारण केंद्र श्रीगोंदे, आदिवासी विचारमंच व लोकाधिकार आंदोलन या संघटनांचे प्रतिनिधी बापू ओहळ, प्रमोद काळे, द्वारका पवार, आसाराम काळे, संतोष गर्जे, ज्योती भोसले, लता सांगळे, लता सावंत, सोमनाथ भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, सदर प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन तात्काळ रद्द करावा, पीडितांना तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी, पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे.

भानगाव येथे दि. 12 सप्टेंबर रोजी शेतात शेळी गेली व तिने कांदा पिकाचे नुकसान केले. या कारणावरून भानगाव येथील जयसिंग वाघस्कर, संतोष वाघस्कर, मनोहर वाघस्कर व जे.सी.बी. चालक लुटे यांनी आदिवासी महिलेचा पती संदीप काळे यास जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीपासून आपल्या पतीला सोडविण्यास गेलेल्या आदिवासी महिलेला देखील जबर मारहाण करून विवस्त्र करण्यात आले.

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. तसेच तुम्ही लोक खोट्या तक्रारी दाखल करतात असे म्हणत टाळाटाळ केली. त्यानंतर सदर महिला व तिच्या कुटुंबियांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व नाशिकचे पोलिस आयुक्त यांचेकडे दाद मागितल्या नंतर 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून घेण्यात आला. मात्र पोलिसांनी आरोपींना अटक करुन जामिनावर सोडून दिले. या प्रकरणी आदिवासी पीडित महिला व तिच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

तत्पूर्वी, या शिष्टमंडळाने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिची व तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी महिला समस्या निवारण केंद्राच्या सदस्या जयश्री काळे, सुनिता बनकर, राणी कोळपे आदी महिला उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com