"कोविड मुक्त गाव'साठी शिस्तीचा कडक बडगा उगारला जाणार

अजित झळके
Monday, 28 September 2020

जिल्ह्यात कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज आढावा बैठकीत केली.

सांगली : जिल्ह्यात कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज आढावा बैठकीत केली. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक शिस्तीचा बडगा आता उगारला जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना प्रशासनाने गंभीर पावले उचलण्याचे ठरवले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते. 

मंत्री श्री. पाटील म्हणाले,""कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करावी. "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणे असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर करावा. हात वारंवार धुवावेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी याबाबी कटाक्षाने पाळाव्यात.'' 

दवाखान्याबाहेर दरपत्रक 
पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध बेड्‌स, ऑक्‍सिजन पुरवठा, बिलांचे व उपचाराचे ऑडिट करण्याच्या अनुषंगाने उपाय योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच हॉस्पीटलबाहेर दरपत्रक लावण्याबरोबरच रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णांबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, अशा सूचना दिल्या.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict disciplinary action will be taken in rural