अनुपस्थित क्रीडा शिक्षकांवर होईल कडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

क्रीडा शिक्षक दिसत नाही, म्हणून खेळाडूंची चिंता वाढत राहते. शालेय प्रशासन मात्र क्रीडा शिक्षकांना न सोडण्याची भूमिका घेते. हा विषय शिक्षक शिक्षकांच्या बैठकीत उपस्थित झाला. 

कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेवेळी क्रीडा शिक्षक उपस्थित न राहिल्यास शाळेवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी आज येथे दिली. 

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी आयोजित शालेय क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. मामा भोसले विद्यालयात बैठक झाली.

क्रीडा स्पर्धेत शाळांनी क्रीडा शिक्षकांना खेळाडूंसमवेत मैदानावर सोडणे आवश्यक असते. मात्र, काही शाळा ठराविक क्रीडा प्रकारांत करीताच क्रीडा शिक्षकांना मैदानावर सोडतात. त्यामुळे स्पर्धेवर त्याचा परिणाम होतो. क्रीडा शिक्षक दिसत नाही, म्हणून खेळाडूंची चिंता वाढत राहते. शालेय प्रशासन मात्र क्रीडा शिक्षकांना न सोडण्याची भूमिका घेते. हा विषय शिक्षक शिक्षकांच्या बैठकीत उपस्थित झाला. 

श्री. साखरे म्हणाले, "क्रीडा स्पर्धेतील प्रकारांवेळी खेळाडूंसमवेत त्या त्या शाळांतील क्रीडाशिक्षक असणे महत्त्वाचे आहे. क्रीडाशिक्षक अनुपस्थित राहिले तर त्या शाळांचा संघ स्पर्धेत घेतला जाणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळांची राहील. त्यामुळे प्रत्येक शाळेने क्रीडा शिक्षकांना खेळाडूंसमवेत सोडणे आवश्यक आहे. याबाबतीत शाळांनी हयगय केली तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. त्या संदर्भातले पत्र सर्व शाळांना पाठविले जाणार आहे."

या वेळी सर्व क्रीडा शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत त्यांना समजावून सांगण्यात आली. ऑनलाइन खेळाडूची नोंदणी झाली नाही तर त्याला स्पर्धेत भाग घेता येणार नाही, असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी क्रीडाधिकारी बालाजी बरबडे, विकास माने, रवींद्र पाटील उपस्थित होते.

स्केटिंग व जलतरण स्पर्धेवेळी क्रीडा शिक्षक व खेळाडू यांनीच मैदानावर हजेरी लावावी. पालकांनी मैदानावर येऊ नये. तसे झाल्यास वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे क्रीडा शिक्षकांनी केवळ खेळाडूंनाच घेऊन मैदानावर यावे, असे आवाहन अधिकारी राजेंद्र घाडगे यांनी केले.

काही क्रीडाशिक्षक खेळाडूंना मैदानावर सकाळी नऊ वाजता पाठवतात आणि स्वत: साडे अकरा वाजता मैदानावर हजेरी लावतात. हा प्रकार चुकीचा असून क्रीडा शिक्षकांनी खेळाडू समवेतच मैदानावर यावे, असे आवाहन प्रा. योगेश पाटील-मांगोरे यांनी केले. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Strong action will be taken against absent sports teachers