कोषागार ‘स्ट्राँग रूम’ला प्रतीक्षा निधीची

आयाज मुल्ला
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

वडूज - संपूर्ण खटाव तालुक्‍यातील विविध शासकीय विभागांची अर्थव्यवस्था पाहणाऱ्या येथील तालुका कोषागार अधिकारी कार्यालयाला नवीन प्रशासकीय इमारतीत जागा मिळाली. मात्र, कोषागार कार्यालयासाठी स्वतंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) बांधण्यासाठी निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

वडूज - संपूर्ण खटाव तालुक्‍यातील विविध शासकीय विभागांची अर्थव्यवस्था पाहणाऱ्या येथील तालुका कोषागार अधिकारी कार्यालयाला नवीन प्रशासकीय इमारतीत जागा मिळाली. मात्र, कोषागार कार्यालयासाठी स्वतंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) बांधण्यासाठी निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

येथील जुन्या तहसीलदार कार्यालयात केवळ १८० चौरस फुटांच्या जागेत तालुका कोषागार कार्यालय आहे. याठिकाणी एक उपकोषागार अधिकारी, एक लिपीक असे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत, तर २०१५ पासून कार्यालयाचे शिपाई पद रिक्तच आहे. अतिशय तोकड्या जागेत हे कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी कार्यरत असून, तालुक्‍यातील विविध शासकीय विभागांची वेतन, पगार, भत्ते आदी आर्थिक कामे या कार्यालयाकडून होत असतात. कार्यालयात जागेअभावी फाईलींचे गठ्ठे एकमेकांवर लागलेले दिसून येतात, तर कोषागार कार्यालयाचा सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) नजीकच्याच पोलिस ठाण्यातील इमारतीमध्ये आहे. नजीकच बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत शासनाच्या विविध विभागांचे कामकाज सुरू झाले आहे. कोषागार कार्यालयालाही या इमारतीत जागा देण्यात आली. मात्र, प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या तरतुदीमध्ये कोषागार कार्यालयाच्या सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) खोलीच्या खर्चाची व फर्निचर साहित्याची तरतूद नव्हती. त्यामुळे सुरक्षा कक्ष व फर्निचर अभावी कोषागार कार्यालय आहे, त्याच जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेत कार्यरत राहिले आहे. 

नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सुरक्षा कक्षाची खोली बांधण्यासाठी दहा लाख रुपये व फर्निचरसाठी साडेसात लाख रुपये असा एकूण साडेसतरा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे ऑक्‍टोबर महिन्यात पाठविण्यात आला आहे. मात्र, तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी खर्चाची तरतूद झाल्यास नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सुरक्षा कक्षाची खोली व फर्निचर साहित्याचे काम मार्गी लागू शकते.

खटाव तालुका कोषागार कार्यालय सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम), फर्निचरसाठी जिल्हा नियोजन समितीमधून भरीव निधी मिळावा, यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांना भेटून निधीसाठी पाठपुरावा करणार आहे.
- डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार

वडूजमधील नवीन प्रशासकीय इमारतीत कोशागार कार्यालयासाठी स्वतंत्र सुरक्षा कक्षाची खोली, फर्निचरसाठी एकूण १७.५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.
- सुधीर चव्हाण, उपकोषागार अधिकारी, खटाव

Web Title: Strong Room Fund