खासदार संजय पाटील - पडळकर यांच्यात पुन्हा टोकाचा संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

आटपाडी - खासदार संजय पाटील आणि स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोप - प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. लोकसभा निवडणूकी अगोदरच दोन्ही नेत्यांकडून परस्परांचे वस्त्रहरण सुरू आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. 

आटपाडी - खासदार संजय पाटील आणि स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोप - प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. लोकसभा निवडणूकी अगोदरच दोन्ही नेत्यांकडून परस्परांचे वस्त्रहरण सुरू आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. 

लोकसभा निवडणूकीत खासदार पाटील आणि श्री. पडळकर भाजपमध्ये होते. लोकसभा निवडणूकीत श्री. पडळकर यांनी  पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता. दोघांचेही एकमेकांच्या गळ्यात गळे होते. पहिले तीन वर्षे शांतता होती. त्यानंतर अंतर्गत धुसफूस सुरू झाली. ती गेल्या चार महिन्यापुर्वी बाहेर पडली. श्री. पडळकर यांनी खास करून खासदार पाटील यांच्यावर तोंडसुख घेत जिल्हयात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नसल्याची टिका करून पक्षाचे काम थांबवले.

यानंतर धनगर समाजासाठी आरक्षणाचा लढा राज्यभर पोहचवत भाजपपासून ते लांब गेले. गेल्या आठवडयापासून दोघांचा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. दोघांच्याकडून एकमेकावर आरोप - प्रत्यारोप, व्यक्तिगत टिंगल-टवाळी सुरू झाली आहे.  दोघांच्याकडूनही लोकसभा निवडणूकीअगोदरच राजकीय वस्त्रहरण सुरू केले आहे.

खासदार पाटील यांनी पुर्वी भंपक माणसाकडे लक्ष देत नाही. तर नुकतीच पडळकरांना बांडगूळाची उपमा देऊन जातीवादाचे विष पेरत असल्याची टिका केली होती.  याचा श्री. पडळकर यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी खासदार पाटील यांना तेच जिल्हयातील एक नंबरचे बांडगूळ असल्याचे उत्तर दिले. शिवाय राजकारणात कोणाच्या मदतीने केलेला प्रवेश, त्यांच्याच विरोधात घेतलेली भूमिका आदीवर प्रकाशझोत टाकून तासगावचा कारखाना गिळला असल्याची टिका केली आहे. तसेच यापुढे खासदारांचे उदयोग आणि कामकाज बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

दोघांनीही आवाहन स्विकारले 
खासदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांने गेल्यावेळी पडळकरांना तासगावात येण्याचे खुले आवाहन दिले होते. दोनच दिवसात श्री. पडळकर यांनी तासगावात जाऊन दाखवले. त्यानंतर परत दोघानीही निवडणूकीत एकमेकांची लायकी दाखवून देण्याचे आवाहन दिले आहे. दोघानीही ते आवाहन स्विकारले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत खासदार पाटील आणि पडळकर यांच्यात जोरदार सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: struggle between MP Sanjay Patil and Gopichand Padalkar