विद्यार्थ्यांना ॲनिमेशन निर्मितीचे धडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

म्हसवड - विजयनगर (पर्यंती) (ता. माण) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मदतीने ॲनिमेशन शिकण्याचे धडे घेत आहेत. त्यासाठी त्यांना तमिळनाडू येथील जॉन एम. राजा हे स्काईपद्वारे मार्गदर्शन करत आहेत. हा उपक्रम राबवण्यासाठी ‘गुगल’ सन्मानित शिक्षक बालाजी जाधव धडपडताना दिसतात.

म्हसवड - विजयनगर (पर्यंती) (ता. माण) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मदतीने ॲनिमेशन शिकण्याचे धडे घेत आहेत. त्यासाठी त्यांना तमिळनाडू येथील जॉन एम. राजा हे स्काईपद्वारे मार्गदर्शन करत आहेत. हा उपक्रम राबवण्यासाठी ‘गुगल’ सन्मानित शिक्षक बालाजी जाधव धडपडताना दिसतात.

माण तालुका तसा दुष्काळी. मात्र, येथे बुद्धीचा दुष्काळ नाही. महादेवाच्या डोंगरावर असलेले विजयनगर (पर्यंती) हे ठिकाण आगदी छोटी वस्ती. मात्र, यावर्षीच्या बदलीने या गावच्या शाळेला एक अभिनव असा शिक्षक लाभला तो म्हणजे बालाजी जाधव. यापूर्वी त्यांनी पुळकोटीच्या शाळेत अवघे जग उभे केले होते. आता हेच जाधव गुरुजींनी नवीन शाळेत व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू केली. मुलांना आजकाल सर्वांत आवडणारी बाब म्हणजे ॲनिमेशन. त्याचे धडे देण्यासाठी म्हणून तमिळनाडू येथील जॉन एम. राजा नावाचा शिक्षक स्काईपद्वारे विजयनगरमधील शाळेतील मुलांना मार्गदर्शन करत आहे.

ॲनिमेशन निर्मिती, त्याचा शिक्षणात वापर याबद्दल दर आठवड्याला एक किंवा दोन वेळा अर्धा तास व्हिडिओ कॉन्फरन्सने ते मार्गदर्शन करताहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही आनंदित झाले आहेत. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुले मराठीतून प्रश्न विचारतात आणि बालाजी जाधव हे त्याचे भाषांतर करून जॉन सरांना सांगतात. विविध प्रकारचे सॉफ्टवेअर वापरून ॲनिमेशन बनवले जातात. त्याचा डेमो जॉन सर देतात आणि विजयनगर शाळेतील शिक्षक, विद्यार्थी ॲनिमेशन शिकण्याचा प्रयोग करतात. प्रथम मुले अगदी अवाक्‌ होऊन नुसती पाहायची. मात्र, आता सरावाने ते चांगला संवाद साधून नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. 

लवकरच येथील मुले उत्तम तंत्रज्ञान अवगत करतील, असा आत्मविश्वास बालाजी जाधव व मुख्याध्यापक भोजा काळेल यांनी व्यक्त केला आहे.

अशा नावीन्यपूर्ण शिकण्याच्या संधीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना उद्याचे ॲनिमेशन निर्माते होण्याचा मार्ग मोकळा होतोय, हा या शिकण्याचा खरा अर्थ आहे.
- जॉन एम. राजा

Web Title: student animation making learning