शेतात ऊस लागण करून भरली महाविद्यालयाची फी

संजय गणेशकर
सोमवार, 16 जुलै 2018

पलूस - प्रवेश फी आणि परीक्षा फी भरण्याची परिस्थिती नसल्याने बऱ्याच गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही. मात्र, परिस्थिती नाही म्हणून गप्प न बसता नवी पुणदी (ता. पलूस) येथील 12 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, ऊस लागणीचे काम करून 1 लाख 60 हजार रुपये जमा करून आपली महाविद्यालयाची प्रवेश व परीक्षा फी भरली.

जमिनी, मालमत्ता, सोने गहाण ठेवून प्रसंगी विकून, कर्ज घेऊन आपल्या मुलांना शिक्षण देणारे अनेक पालक आहेत, तर अजिबात परिस्थिती नाही म्हणून अर्धवट शिक्षण घेणारे विद्यार्थीही आहेत. तसेच आई - वडिलांबरोबर मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या मुलांची उदाहरणेही अनेक आहेत. नवी पुणदी येथील 12 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. यातील कोणाचे आई -वडील मोलमजुरी करतात, तर काहींचे आई-वडील अल्प भूधारक शेतकरी आहेत.

विनोद जाधव (एम. ए.), मनोज जाधव (बी. ए.), सुहास दमामे (बीएस्सी), ओंकार जाधव, अनिकेत जाधव, सूरज जाधव, प्रशांत जाधव, स्वप्नील माने (आय. टी.आय), अनिकेत जाधव (पदविका), रोहित शिंदे, सूरज मुळीक (एमएस्सी), संस्कार मुळीक अशी या विद्यार्थ्यांची नावे आहे. यातील संस्कार मुळीक याला शेती कामाची आवड होती. त्यातून आपल्या मित्रांना एकत्र आणून सुटीमध्ये नवी पुणदी व परिसरातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांची 40 एकर उसाची लागण केली. एकरी 4 हजार रुपयेप्रमाणे त्यांनी 1 लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम घाम गाळून उभी केली.

यापुढेही कष्टाची तयारी
घरची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून गप्प न बसता, कष्ट करून शिक्षण घेण्याची तयारी हवी. कष्टाच्या पैशाने घेतलेल्या शिक्षणाची खरी किंमत कळते. पुढील शिक्षण घेण्यासाठी आणखी कष्टाची तयारी असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Web Title: student college fee work in farm