साताऱ्यात विद्यार्थ्यांचे झाले पर्यावरणपूर्वक स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सातारा - जैवसमृद्धता, निसर्गसंपन्नता हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित विषय न ठेवता येथील दातार- शेंदुरे इंग्लिश स्कूलने आज हा विषय विद्यार्थ्यांपुढे मांडला. निसर्गसंपन्न कास आणि सातारा परिसरातील विपुल जैवविविधता पोस्टर, छायाचित्रे, फ्लेक्‍सच्या माध्यमातून शाळेच्या प्रांगणात मांडण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही या उपक्रमाची माहिती घेण्यात दंग होते. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार-शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत वेगळ्या उपक्रमाने करण्यात आले. 
जिराफ, ससा, वाघ, घोडा, कावळा, पोपट, मोर आदी पशुपक्ष्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 

‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, रानवाटा मंडळाचे डॉ. संदीप श्रोत्री, मुख्याध्यापिका शबनम तरडे, सोसायटीच्या शैक्षणिक सल्लागार सुजाता धर्माधिकारी उपस्थित होते. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेले कास पठार व सातारा परिसरातील विपुल जैवविविधतेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी, या उद्देशाने मुख्याध्यापिका तरडेंनी पुढाकार घेतला. 

कासची वैशिष्ट्यपूर्ण फुले, दुर्मिळ वनस्पती, परिसरात आढळणारे प्राणी- पक्षी- कीटक आदींची माहिती व छायाचित्रे, नकाशे, भित्तिपत्रकांच्या माध्यमातून देण्यात आली. डॉ. श्रोत्री, डॉ. जितेंद्र कात्रे, कैलास बागल, डॉ. बडवे, नरेंद्र जाधव यांनी या उपक्रमासाठी छायाचित्रे उपलब्ध करून दिली. 

साताऱ्याच्या जैवविविधतेच्या अनुषंगाने विविध वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्या, लेखांची कात्रणे आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती. ‘सकाळ’च्या पुढाकाराने लोकसहभागातून प्लॅस्टिकमुक्त कास मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम, बातम्या, छायाचित्रांचीही मांडणी करण्यात आली होती.

जैवविविधतेचे संरक्षण हा विषय घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वर्षभर जाणीव जागृतीपर उपक्रम राबणार आहोत. पर्यावरणपूरक पाऊल म्हणून आजपासून शाळा परिसरात प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी केली आहे. स्टाफ, विद्यार्थी, पालक येथे प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणार नाहीत. 
- शबनम तरडे, मुख्याध्यापिका, दातार-शेंदुरे इंग्लिश स्कूल, सातारा

Web Title: student environment education