विद्यार्थ्याने नाल्यात उतरून बाहेर काढले मृत अर्भक !

परशुराम कोकणे
मंगळवार, 27 मार्च 2018

"म. कैफच्या धाडसाचे खरचं कौतुक आहे. काही मुले अभ्यासात मागे असली तरी त्यांच्या काहीतरी वेगळपण असते. अशापैकीच म. कैफ एक आहे. त्याच्या धाडसाबद्दल आम्हाला अभिमान असून, त्याला शिक्षणासोबतच त्याच्या आवडीच्या विषयात आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. 

- अरुण शिखरे, मुख्याध्यापक

सोलापूर : मौलाली चौक परिसरातील नाल्यात गेल्या आठवड्यात मृत अर्भक सापडल्याची घटना घडली. नाल्यात उतरून त्या मृत अर्भकाला काढून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या सातवीत शिकणाऱ्या म. कैफ महिबूब बुऱ्हाण या विद्यार्थ्याचे परिसरात कौतुक होत आहे. 

म. कैफ हा शास्त्री नगर परिसरातील श्री समर्थ विद्या मंदिर येथे सातवीमध्ये शिकण्यास आहे. तो मौलाली चौक परिसरात राहण्यास आहे. गेल्या आठवड्यात मौलाली चौकातून जाणाऱ्या नाल्यात एक मृत अर्भक सापडले. नाल्याजवळ बघ्याची गर्दी झाली. गर्दी पाहून म. कैफ तिथे गेला. नाल्यात अर्भक विडी पत्त्यामध्ये अडकले होते. गर्दीतल्या कोणीतरी पोलिसांना फोन करून माहिती दिली. 

काही वेळातच पोलिस आले. मृत अर्भक बाहेर काढण्यासाठी गर्दीतून म. कैफ धाडसाने पुढे आला. त्याने हातात प्लास्टिक कॅरीबॅग घातली. नाल्यात उतरून त्याने धाडसाने त्या अर्भकास अलगद उचलेले आणि पोलिसांकडील पिवशीमध्ये ठेवले. 

जमलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी म. कैफचे कौतुक केले. या घटनेची माहिती शाळेत कळाल्यानंतर मुख्याध्यापक अरुण शिखरे, वर्गशिक्षिका श्रुती शिखरे यांच्यासह शिक्षकांनी त्याचे कौतुक केले. शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्या धाडसाबद्दल सन्मान करण्यात आला.

Web Title: Student have rescued dead Child from water